पालघर Tribal Sugarcane Workers :ऊसतोड करण्यासाठी पालघर जिल्ह्यातील आदिवासी मजूर सातारा जिल्ह्यांतील कारखान्याच्या ऊसतोडणीसाठी गेले होते. या टोळीतील काही मजूर मध्येच पळून गेल्यानं राहिलेल्या मजुरांना डांबून ठेवून मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक बाब पुढं आली आहे. त्यांना वेठबिगारासारखी वागणूक मिळाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं राज्यभरात खळबळ उडाली. दरम्यान, श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष विवेक पंडित आणि जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांच्या मदतीनं 25 ऊसतोड मजुरांची सुटका करण्यात आली. सुटका करण्यात आलेल्या मजुरांमध्ये 13 मुलांचा समावेश आहे.
मजुराला मुकादमाकडून मारहाण :कोरेगाव तालुक्यातील कारखान्याच्या ऊसतोडणीसाठी जव्हार इथले आदिवासी ऊसतोड मजुरांना मुकादमानं नेलं होतं. त्यासाठी या मजुरांना आगाऊ रक्कम देण्यात आली होती. गेल्या चार महिन्यांपासून मजुरांची टोळी तिथं ऊसतोडणी करते, परंतु त्यातील काही लोक ऊसतोडणीचे काम अर्धवट सोडून आगाऊ रक्कम न देता पळून गेले. त्यामुळं मुकादमानं राहिलेल्या आदिवासी मजुरांना छळायला सुरुवात केली आहे. गेल्या 15 दिवसापासून त्यांना मारहाण केली जात असल्याचा आरोप या मजुरांनी केला आहे. यातील एका मजुराला जबर मारहाण झाली असून, तो जखमी आहे. या टोळीतील 25 लोकांना सध्या वेठबिगाराची वागणूक मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दररोज 14-15 तास काम करूनही आठवड्यातून एकदा एक हजार रुपये दिले जात असल्याचा आरोप मजुरांनी केला आहे.
मजुरांवर अत्याचाराच्या घटनेला अशी फुटली वाचा :पालघर जिल्ह्यातील मजुरांना डांबून त्यांच्याकडून काम करून घेतलं जात असल्याचा व्हिडिओ एका मजुरानं बनवला होता. 14 पैकी 4 कुटुंब पळून गेल्यानं या मजुराला मारहाण केल्याचंही त्यानं व्हिडिओमध्ये सांगितलं. या व्हिडिओची तत्काळ दखल घेत श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी श्रमजीवी संघटनेचे एक पथक सातारा इथं पाठवत या 12 मजुरांची आणि 13 बालकांची सुटका केली आहे. याबाबत सबंधित मालकावर साताऱ्यातील कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.