पालघर -शासनाने आदिवासी बांधवांसाठी खावटी योजना जाहीर केली असली तरीही अद्याप या योजनेची अंमलबजावणी झालेली नाही. याविरोधात श्रमजीवी संघटनाच्यावतीने आज पालघर तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलक आदिवासी भगिनींनी तयार केलेली दिवाळीचा फराळ राज्याचे आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी यांना दिवाळी भेट म्हणून तहसीलदारांमार्फत पाठवण्यात आला.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आदिवासींना आर्थिक व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप खावटी योजनेअंतर्गत करण्याचे 9 सप्टेंबर रोजी शासनाकडून जाहीर करण्यात आले. मात्र अजूनही या योजनेचा लाभ आदिवासींना मिळालेला नाही. दिवाळीचा सण गेला, तरीही या योजनेची अंमलबजावणी झाली नसल्याने अनेक गरीब आदिवासींनी आपली दिवाळी दारिद्र्यात घालवावी लागली. आजवर अनेक आंदोलने करून देखील पदरी निराशाच पडली आहे. याचा निषेध म्हणून राज्याचे आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी यांना आदिवासी भगिनींकडून आपल्या शिदोरीतील फराळ तहसीलदारांमार्फत पाठवण्यात आला.