वसईगणेशचतुर्थी नंतर शनिवारी गौरींचे आगमन झाले. यामध्ये सार्वजनिक तसेच घरगुती गौरींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. मात्र याच बरोबर परंपरेप्रमाणे वसई तालुक्यात टाकळा तेरड्याच्या गौरी आवाहन घरोघरी केले जाते. शनिवारी माहेरवाशीण म्हणून सोनपावलांनी अशा गौरी आल्या. यानंतर रविवारीची पुजा व सोमवारी मोठ्या भक्तीभावाने या गौरींना निरोप देण्यात आला.
महिला वर्गात उत्साह या गौराईचे सर्व सोपस्कार मुख्यत्वे घरातील गृहिणी बालगोपाळांच्या साथीने करण्याची येथे प्रथा आहे. यामध्ये गौरी आवाहन म्हणजेच गौरीला अंगणातून ओट्यावर आणणे, ओट्यावर रांगोळी काढून त्या रांगोळीवर पाट व पाटावर सूप ठेवून त्यामध्ये गौरी ठेवून पूजन करणे . पूजेच्या या ठिकाणापासून संपूर्ण घरात गौरी वास करत असल्याच्या पाऊलखुणा व हाताचे ठसे तांदळाच्या पीठाने व हळदी व कुंकुने रन्गवणे. यालाच येथे सोनपावलांनी गौरी मातेने घरात प्रवेश केला असल्याचे मानले जाते. याचवेळेस घरातील व्हरांड्यात किंवा आताच्या शब्दाप्रमाणे हॉल मध्ये छानशी आरास करून त्यामध्ये गौरी स्थापित करणे. यावेळी होणारी संपूर्ण पूजा अर्चा घरातील महिलाच करतात .
विविध पद्धतीचा नैवद्य माहेरवाशीण म्हणून आलेल्या गौराईला नैवध्य म्हणून तालुक्याचे मुख्य पीक असलेल्या तांदळाच्या पिठापासून व नारळ गुळाचा चव वापरून केलेले उकडीचे मोदक, घराच्या परस बागेत उगवणाऱ्या देठाची भाजी, तांदळाची खीर,तांदळाची भाकरी,गुळाबरोबर उकडलेले पोहे आदी भात पिकाशी निगडित असलेला नैवैध्य दाखवला जातो. येथे परंपरेप्रमाणे बसणाऱ्या गौरी या भाद्रपद महिन्यात उगवणाऱ्या टाकळा ,तेरडा,गौरीफुले,विशिष्ट प्रकारचे तण यांची जुडी बांधून व त्या जाडीच्या पुढे हार गजरे व फुलांच्या माळा माळलेल्या गौराईचे छापील चित्र लावलेले असते. गौराईची जुडी हि या भागातील आदिवासी महिला रानावनांतु गोळा करून बाजारात विकण्यास येतात . यानिमित्त त्यांना रोजगारही मिळतोच पण अशी गौरी दारावर विकत घेताना विकणाऱ्यांना कुंकू लावून मानही दिला जातो. याच प्रतिमेला माहेरी आलेली देवी गौरीमाता म्हणून मनोभावे पूजन केले जाते . हि येथील विशेषकरून ग्रामीण भागातील वर्षानुवर्षांची परंपरा आहे .
रात्र जागरआरास बनविताना गणपती उत्सवासाठी जशी आरास केली जाते तशी घरातील चांगल्या कपड्यांपासून आरास मखर केली जाते. पूजन करून घरात व भिंतीवर गौरी आगमनाचे हाताचे व पायाचे ठसे उमटवून गौरीला घर दाखवले जाते. यावेळी रात्र जागर करताना एका ढोलकीच्या तालावर फेर धरून महिला भगिनी पारंपरिक नाच करताना गौरी व गणपतीची पारंपरिक गीते एका सुरात गातात . विसर्जनाच्या वेळी गौरीची चित्र प्रतिमा असलेला फोटो काढून घरातील देव्हाऱ्यात ठेवतात व उरलेल्या जुडीचे विसर्जन पाण्याच्या प्रवाहात न करता आताच उभारी घेतलेल्या भात शेतीच्या मधोमध ठेवतात.