पालघर -जिल्ह्यातील पालघर-वाडा-देवगाव या रस्त्याचे वाडा शहरात रुंदीकरणाचे काम सूरू आहे. या रस्ता रूंदीकरणाविरोधात वाडा शहरातील व्यापारी असोसिएशनने कडकडीत बंद पाळला आहे. या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा देणारे दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. हा बंद सोमवारी सकाळी 9 पासून सुरू करण्यात आला आहे. तर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मनमानी कारभाराविरोधात 2 मार्चपासून ते न्याय मिळेपर्यंत हा बंद पुकारण्यात येणार असल्याचे फलकही वाडा शहरात लावण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील पालघर-वाडा-देवगाव या राज्यमार्गाच्या रुंदीकरणाचे काम सद्या वाड्यात सुरू आहे. हा रस्ता वाडा शहरातून जात असल्याने येथील दुतर्फा असलेल्या व्यापारीवर्गाची दुकाने तुटणार आहेत. काही ठिकाणी गटार बांधणीची कामे चालू आहेत. रस्ता रुंदीकरण साडे दहा मीटरचे असताना या रस्त्याचे 16 मीटर रुंदीकरण करण्यात येणार असल्याच्या नोटीस व्यापाऱ्यांना देण्यात आल्या असल्याचे व्यापारीवर्गाचे म्हणणे आहे.