पालघर -पावसाळा सुरू होताच पर्यटकांना गड-किल्ल्यांची ओढ लागते. त्यातच कोरोना निर्बंध शिथील होताच पर्यटकांची पावलेही पर्यटनस्थळाकडे वळू लागतात. जिल्ह्यातील आशेरी गडावर मागील रविवारी पर्यटकांनी हजारोंच्या संख्येने गर्दी करत कोरोना नियमांना हरताळ फासला. त्यानंतर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हा प्रशासनामार्फत गडावर जाण्यास बंदी घालण्यात आली असून याठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पालघरमधील आशेरी गडावर पर्यटनास बंदी गड-किल्ल्यांवर पर्यटनास बंदी-
प्रसिद्ध असलेल्या पालघरमधील आशेरी गडावर पर्यटनास बंदी घालण्यात आली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. जिल्हा प्रशासनाचा पुढील आदेश येईपर्यंत गडावर बंदी घालण्यात आली असून बंदोबस्तासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गडाच्या पायथ्याशी वनविभाग आणि पोलिसांच्या माध्यमातून नाकाबंदी करण्यात आली असून गडावर येणाऱ्या पर्यटकांना आता माघारी फिरावे लागत आहे.
पर्यटकांनी केली होती गर्दी-
पालघर जिल्ह्यातील वाडा-खडकोना या गावातील आशेरी गडावर पर्यटकांनी हजारोच्या संख्येने गर्दी केल्याचे चित्र पहायला मागील रविवारी (13 जून) पहायला मिळाले होते. आशेरी गडावर पालघरसह मुंबई, ठाणे, गुजरात या बड्या शहरातील पर्यटक मोठ्या संख्येने ट्रेकिंग व पर्यटनासाठी येत असतात. मागील रविवारी हजारोच्या संख्येने पर्यटक गडावर दाखल झाले होते. पर्यटकांकडून कोरोना नियमांना केराची टोपली दाखवविण्यात आल्याचे चित्र समोर आले.
कोरोना संसर्ग वाढण्याची भीती -
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असताना पर्यटकांचा निष्काळजीपणा समोर आला आहे. मात्र या वाढत्या गर्दीमुळे पुन्हा कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनाचे संकट हळूहळू कमी होऊ लागल्याने पर्यटकांचा ओढा पर्यटनस्थळी वाढू लागला होता. यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हेही वाचा -'बायकोने मारले, तरी हे मोदींना दोषी ठरवतील'; फडणवीसांचा महाविकास आघाडीच्या नेत्यांना टोला