पालघर/डहाणू : विशेष केंद्रीय सहायता निधी २७५/१ या योजनेतून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या अस्वाली येथील शासकीय आश्रमशाळेत २०१७ - १८ या वर्षात मंजूर झालेल्या शौचालय व स्नानगृहाच्या इमारतीचे पायोनियर कन्ट्रक्शन या ठेकेदार कंपनी कडून बांधकाम सुरू आहे. नियमानुसार बांधकामासाठी रेती किंवा क्रश सँड वापरण्याची परवानगी असताना ठेकेदाराने या बांधकामासाठी गिरीट पावडरचा वापर केला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत पायालगतच्या काँक्रीट कॉलमला तडा गेल्या आहेत. काँक्रीट बांधकाम पक्के होण्यासाठी पाण्याचा वापर केला जातो. मात्र, याठिकाणी त्यावर पाणीच शिंपडले जात नाही. त्यामुळे आजपर्यंत झालेले बांधकाम निकृष्ट दर्जाचे आहे. ते किती टिकणार ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (quality of construction of the toilet and bathroom is poor)
बांधकाम साहित्य निकृष्ट दर्जाचे वापरले :शासकीय इमारतीचे बांधकाम अभियंत्याच्या देखरेखीखाली होणे गरजेचे आहे. याविषयी डहाणू प्रकल्पाचे कनिष्ठ बांधकाम अभियंता गजानन जाधव यांना विचारले असता, मी याठिकाणी तीन वेळा भेटी देऊन कामाची पाहणी केली आहे, असे सांगण्यात आले. कामाची पाहणी करूनही जर काम निकृष्ट दर्जाचे होत असेल, तर यास जबाबदार कोण ? ठेकेदार व अभियंता यांच्या संगनमताने हे बांधकाम होत असल्याने ठेकेदार मनमानी पद्धतीने काम करीत असल्याचे दिसून येत आहे. ठेकेदाराने शासनाच्या अंदाजपत्रकीय रकमेपेक्षा कमी दराने २०१७ - १८ यावर्षी काम घेतले होते. ते २०२२ च्या अखेरीस सुरू आहे. त्यामुळे आता बांधकाम साहित्य निकृष्ट दर्जाचे वापरून काम कसेबसे पूर्ण करायचे अशी ठेकेदारची लगबग सुरू आहे.