पालघर - जिल्ह्यातील कुपोषणाचा आलेख वाढला असून मे महिन्यात नोंद झालेल्या अतितीव्र कुपोषित (SAM) बालकांच्या तुलनेत जून महिन्यातील आकडा आठने वाढला आहे. लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील कुपोषणग्रस्त आदिवासीबहुल भागातील अंगणवाड्या आणि आरोग्य यंत्रणा पूर्णपणे ठप्प राहिल्याने हा परिणाम जाणवत आहे. आता पावसाळा सुरू झाल्याने कुपोषित बालकांची संख्या वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पालघरमध्ये आरोहण संस्था कुपोषित बालकांसाठी काम करते आहे एकेकाळी पालघर जिल्ह्याची कुपोषणासाठी कुप्रसिद्ध जिल्हा म्हणून ओळख राहिलेली आहे. जिल्ह्यात २०१६ मध्ये ८६१ अतितीव्र कुपोषित बालके होती तर ५६५ बालकांचा मृत्यू झाला होता. मात्र, याचे गांभीर्य लक्षात घेत शासन आणि प्रशासनाने कुपोषण निर्मूलनासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू करत विविध उपाययोजना केल्यामुळे कुपोषित बालकांसह माता मृत्यू व बाल मृत्यूचा आलेख कमी झाला होता. गेल्यावर्षी देखील ही आकडेवारी कमी होती. मात्र, यंदा मार्च दरम्यान कोरोना महामारीमुळे सर्वत्र लॉकडाऊन जाहीर झाले व ग्रामबाल विकास केंद्रांसह अंगणवाड्या बंद राहिल्या. परिणामी कुपोषित बालकांची संख्या पुन्हा वाढली आहे.
पालघर जिल्ह्यातील कुपोषणाची समस्या सोडवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू या अतितीव्र व तीव्र कुपोषित बालकांना तसेच स्तनदा व गरोदर मातांना घरी जाऊन ग्रामबाल विकास केंद्राच्या माध्यमातून सकस व पोषण आहार देण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत विशेष प्रयत्न सुरू आहेत. डिसेंबर २०१९ मध्ये जिल्ह्यात ३१८ अतितीव्र कुपोषित बालके होती. जानेवारी २०२० ही संख्या ३२५ झाली तर फेब्रुवारीमध्ये ही संख्या घटून २७० व मार्च महिन्यात २७२ इतकी होती. एप्रिल महिन्यामध्ये असलेली आकडेवारी लक्षात घेता मे व जूनमध्ये अतितीव्र कुपोषित बालकांचा आकडा वाढला आहे. एप्रिल २०२० मध्ये अतितीव्र कुपोषित बालकांची संख्या २१३ इतकी होती तर मे मध्ये ती १३ ने वाढली असून २२६ इतकी नोंदवण्यात आली. जून मध्ये ही संख्या ८ ने वाढली असून २३४ अतितीव्र कुपोषित बालके आढळली आहेत.
तीव्र कुपोषित बालकांची संख्या जून २०१९ मध्ये तीव्र कुपोषित बालकांची संख्या २ हजार ३९६ होती यावर्षी ही संख्या २ हजार २२५ इतकी आहे. याचाच अर्थ ही संख्या १७१ बालकांनी घटली आहे. पालघर जिल्ह्यात १ हजार ३३६ ग्राम बाल विकास केंद्र असून यामध्ये १४५ अतितीव्र कुपोषित बालके तर २ हजार २२० तीव्र कुपोषित बालके उपचार घेत आहेत. लॉकडाऊन दरम्यान पालघर जिल्ह्यात ग्राम बाल विकास केंद्र स्थापन करण्यासाठी शासनामार्फत परवानगी मिळाली नव्हती, त्यामुळे काही बालके ही या केंद्राच्या प्रवाहाबाहेर गेली आहेत. यामुळे सकस व पोषण आहार मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या असून परिणामी तुरळक प्रमाणात कुपोषण वाढल्याचे दिसून आले. असे असले तरी जिल्हा प्रशासनामार्फत कुपोषण नियंत्रणात आणण्यासाठी व त्याच्या निर्मूलनासाठी विविध विभागाच्या समन्वयाने प्रयत्न सुरू झालेले आहेत. या माध्यमातून हे कुपोषण कमी करण्यात नक्कीच मदत होईल असे जिल्हा प्रशासनामार्फत सांगण्यात आले आहे.
अतितीव्र कुपोषित बालकांची संख्या आठवडाभरापूर्वी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी पालघरचा दौरा केला. आदिवासी बहुल पालघर जिल्ह्यात कुपोषणाची समस्या सोडवण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून सरकारमार्फत विविध योजना राबवण्यात येत आहेत. या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचत आहेत की नाही, जिल्ह्यातील कुपोषणाची स्थिती आणि त्याबाबतच्या उपाययोजना करण्यासाठी पालघर जिल्ह्याचा दौरा त्यांनी केला होता. त्यानंतर त्यांनी एक आढावा बैठक देखील घेतली होती.