नियोजन शून्य शासकीय यंत्रणेच्या चुकांची शिक्षा वसईकरांना भोगावी लागतीय - विवेक पंडित
गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने पूर येत आहे. त्यावर उपायोजना करण्याऐवजी वसईतील शासनकर्ते व अधिकारी 'नैसर्गिक आपत्ती'च्या नावाखाली आपली चूक निसर्गावर ढकलत आहेत, असे मत विवेक पंडित यांनी व्यक्त केले. आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी पूरग्रस्त भागातील प्रतिनिधींच्या भेटी घेवून समस्या जाणून घेतल्या.
नियोजन शून्य व्यवस्थापन आणि शासकीय यंत्रणेच्या चुकांची शिक्षा वसईतील सामान्य नागरिकांना; विवेक पंडित
पालघर - नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे वसई तालुक्यात जनजीवन विस्कळीत झाले. गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने पूर येत आहे. त्यावर उपायोजना करण्याऐवजी वसईतील शासनकर्ते व अधिकारी 'नैसर्गिक आपत्ती'च्या नावाखाली आपली चूक निसर्गावर ढकलत आहेत, असे मत विवेक पंडित यांनी व्यक्त केले आहे.
आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांच्या अध्यक्षतेखाली आज(शुक्रवार) तहसीलदार कार्यालयात पूरपरिस्थिती, पंचनामे, मदतकार्य व उपाययोजनांबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी वसईचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मंडळ अधिकारी, महानगर पालिका अधिकारी, पोलीस अधिकारी, बीडीओ उपस्थित होते. नियोजन शून्य व्यवस्थापन आणि शासकीय यंत्रनेच्या चुकांची शिक्षा वसईतील सामान्य नागरिक भोगत आहे. वसईतील अनधिकृत बांधकामे, पाणथळ जागा, तलाव, बावखल हे सुशोभीकरणाच्या नावाखाली बुजवले जात आहेत. यामुळेच वसई बुडत असल्याचा आरोप पंडित यांनी केला.
वसईतील पूर हा पूर्णतः मानवनिर्मित आहे. राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार या परिस्थितीस जबाबदार असलेल्या अधिकारी, ठेकेदार यांच्यावर तत्काळ कारवाई करावी, असे आदेश पंडित यांनी दिले. यावेळी वसईतील पूरग्रस्त भागातील प्रतिनिधींच्या भेटी घेवून समस्या जाणून घेतल्या. पंडित यांच्या दौऱ्यामुळे वसईतील सामान्य जनता समाधानी असून शासकीय यंत्रणेची धावपळ उडाली आहे.