पालघर -फेसबूकवर वस्तू खरेदी-विक्रीचे प्रकार वाढत आहेत. त्याचप्रमाणे फसवणुकीचे गुन्हे वाढत चालले आहेत. असाच एक प्रकार वसईमध्ये घटना आहे. एका तरुणाने आपली दुचाकी विकण्यासाठीची जाहीरात फेसबूकवर दिली होती. ती दुचाकी खरेदी करण्यासाठी आलेल्यानेच दुचाकी त्याच्या डोळ्यासमोरून पळवली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे, एसील्टन परेरा हा तरुण आपली दुचाकी विकण्यासाठी फेसबूक मार्केट प्लेस येथे जाहिरात दिली होती. याला प्रतिसाद देत एकाने एसील्टनशी संपर्क साधला. फोनवर बोलणे झाल्यानंतर दोघांनी भेटण्याचे ठरवले. गजबजलेल्या ठिकाणी दोघे भेटलेही यावेळी एक चक्कर मारून येतो, अशी थाप मारत चोरट्याने एसील्टनच्या डोळ्यासमोरुन दुचाकी नेली. ती व्यक्ती परत येईल या आशेवर एसील्टन खूप वेळ थांबला. पण, तो आलाच नाही. यावरुन आपली फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर त्याने याबाबत माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यावरुन अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून यावरुन पोलीस तपास करत आहेत.
ऑनलाइन जाहिरात करुन चोरट्यांना संधी देऊ नका