पालघर -गेल्या काही महिन्यांपासून डहाणू वन परिक्षेत्रातील राई, कंकराडी, आगर, वाकी गावाच्या परिसरात बिबट्याचा वावर सुरू असल्याची घटना समोर आली आहे. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बिबट्याने मानवी वस्तीत शिरून पाळीव कुत्र्याची शिकार केली होती. त्यांनतर आता पुन्हा एकदा दिवसा ढवळ्या बिबट्याने कुत्र्याची शिकार केली आहे. मानवी वस्तीत बिबट्याच्या वावर सुरू असल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले ( leopards in Dahanu Dog hunting ) आहे.
डहाणू शहरापासून जवळच असलेल्या रेल्वे गेट नं. 58 परिसरात आर्किटेक्ट विलास राऊत ह्यांची वाडी आहे. विलास राऊत गेल्या 40 वर्षापासून येथे वास्तव्य करत आहेत. वाडीत त्यांनी विकेंड हाऊस बांधले असून, ते डहाणू फिरायला येणाऱ्या पर्यटकांना बंगले भाडे तत्वावर देत असतात. सध्या पाऊस खूप असल्यामुळे पर्यटकांची वर्दळ कमी आहे. अश्यात परिसरात शांततेचे वातावरण आहे. शुक्रवारी विलास राऊत हे कामानिमित्त मुंबई येथे गेले होते. दरम्यान, ते राहत असलेल्या बंगल्याजवळ त्यांचा पाळीव कुत्रा बसलेला असताना दुपारी 3.30 ते 4 च्या दरम्यान बिबट्याने कुत्र्यावर हल्ला करून कुत्र्याची शिकार केली आहे. बंगल्याची देखरेख करणारा कामगार जेव्हा कुत्र्याला खान देण्यासाठी बंगल्याजवळ आला तेव्हा कुत्रा जागेवर नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी परिसरात कुत्र्याचा शोध घेतला असता, बंगल्यापासून 30-35 फूट अंतरावर बिबट्या कुत्र्याचा फडशा पाडत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. परिसरात माणसाची चाहूल लागताच बिबट्याने तेथून पळ काढला, त्यानंतर कामगाराने विलास राऊत ह्यांना सगळी घटना सांगितली व राऊत ह्यांनी संबंधित यंत्रणांना घटनेची माहिती दिली.