पालघर - ऑनलाईन शिक्षणापासून वंचित असलेल्या व तत्सम सुविधा नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी 'शिक्षण विद्यार्थ्यांच्या दारी' हा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाअंतर्गत शालेय शिक्षणाचे धडे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना घरीच घेता येणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची योग्य सोय होणार असून, त्यांच्या पालकांना दिलासा मिळाला आहे.
'शिक्षण विद्यार्थ्यांच्या दारी', ऑनलाईन सुविधा नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांचा पुढाकार
ऑनलाईन शिक्षणापासून वंचित असलेल्या व तत्सम सुविधा नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी 'शिक्षण विद्यार्थ्यांच्या दारी' हा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाअंतर्गत शालेय शिक्षणाचे धडे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना घरीच घेता येणार आहेत.
कोरोनाकाळात शाळा, महाविद्यालय बंद असल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून शैक्षणिक धडे देण्याचे शासनाने म्हटले होते. मात्र, पालघर जिल्ह्यातील दुर्गम भागातील तालुक्यांमध्ये ऑनलाईन शिक्षण घेण्याची सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध नाही. परिणामी हे विद्यार्थी या ऑनलाईन शिक्षणाच्या प्रवाहापासून वंचित राहिले व यामुळे त्यांच्या पालकांना धास्ती लागली होती. तसेच शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर गेल्याने विद्यार्थ्यांचा कल मोलमजुरीकडे वळत असल्याचे शिक्षकांना पाहावयास मिळाले. त्यानंतर अशा विद्यार्थ्यांसाठी 'शिक्षण विद्यार्थ्यांच्या दारी' हा उपक्रम जिल्हा परिषद व शिक्षकांमार्फत सुरू करण्यात आला आहे. तलासरी तालुक्यातील शाळांचा निकाल चांगला असला तरी अशा विविध कारणांमुळे तो निकाल घसरण्याची शक्यता लक्षात घेत शिक्षकांनी एकत्रित येत या परिस्थितीवर मात करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी तलासरी तालुक्यातील सुमारे १५४ जिल्हा परिषद शाळांमधील २०० हून अधिक शिक्षकांनी एकत्र येत ऑनलाईन शिक्षणापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे ठरवले. यासाठी शालेय पाठ्यक्रमावर आधारित असलेला 'शिक्षण विद्यार्थ्यांच्या दारी' हा स्तुत्य उपक्रम तलासरी तालुक्यातील शिक्षकांनी १ जुलैपासून हाती घेतला आहे.
ऑनलाईन शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी या शिक्षकांनी विविध अभ्यास गट तयार करून त्या गटाच्या माध्यमातून शाळा क्षेत्रांमधील विद्यार्थ्यांना घरी जाऊन शिक्षण देण्याचे प्रस्तावित केले. त्यानुसार शिक्षकांच्या या अभ्यास गटाने विद्यार्थ्यांना सहज व सोपे शालेय शिक्षणाचे धडे मिळावे यासाठी शालेय पाठ्यक्रमावर आधारित स्वाध्याय पुस्तिका तयार केली. या स्वाध्याय पुस्तिकेमध्ये धड्यावर आधारित प्रश्नावली तयार करण्यात आली. या स्वाध्याय पुस्तिकेच्या माध्यमातून शिक्षकांनी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन विद्यार्थ्यांना अध्यापन दिले. यासाठी एका शिक्षकामार्फत दिवसभरात ७ ते ८ विद्यार्थ्यांना शैक्षणिक धडे दिले जात आहेत. एका विद्यार्थ्यांला किमान अर्धा तास हे धडे शिक्षकांमार्फत दुर्गम भागात घरोघरी जाऊन दिले जात आहेत. यामुळे ऑनलाईन शिक्षणापासून वंचित असलेल्या हजारो विद्यार्थ्यांच्या घरात विनाशुल्क शिक्षण शिक्षकांमार्फत पोहोचवले जात आहे. त्यामुळे सर्व शिक्षकांनी एकत्र येत राबवण्यात आलेल्या या स्तुत्य उपक्रमातील शिक्षकांचा शिक्षण देण्याचा मूळ उद्देश सफल होत आहे.या विद्यार्थ्यांना घरीच शिक्षकांमार्फत शालेय पाठ्यक्रमाचे धडे मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाला घेऊन सकारात्मकता येत आहे. याचा दृश्य परिणामही दिसून येत आहे. काही ठिकाणी विद्यार्थी स्वतःहून या स्वाध्याय पुस्तिका शाळेतून अभ्यासासाठी घेऊन जात आहेत असे शिक्षकांनी म्हटले आहे. विशेषतः हा उपक्रम चौथी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी तालुक्यात राबवला जात आहे. तर पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांना अक्षरे गिरवण्याचे धडे मिळत आहेत. शिक्षणापासून परावृत्त होऊ नये, या भावनेने शिक्षकांनी सुरु केलेला हा उपक्रम स्तुत्य आहे. शिक्षण विद्यार्थ्यांच्या दारी हा तलासरी पॅटर्न जिल्ह्यात इतरत्रही सुरू झाल्याचे दिसून येत आहे. विक्रमगड, जव्हार, मोखाडा आदींसह जिल्ह्यातील दुर्गम भागात शिक्षक विद्यार्थ्यांच्या दारी जाऊन त्यांना शिक्षणाचे धडे देत आहेत. या उपक्रमामुळे ऑनलाईन शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर जाणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यास नक्कीच मदत होत आहे.