पालघर- डहाणू तालुक्यातील चिखले समुद्र किनारी ताडबिया रोपणाचा उपक्रम मागील आठ वर्षांपासून राबविला जात आहे. यंदाही हा उपक्रम जोमाने पार पाडला. या उपक्रमामुळे आजतागायत चिखले समुद्र किनारी शेकडो रोपे जगविण्यात यश आले आहे.
डहाणू समुद्रकिनारी ताडबिया रोपणाचे अभियान; उपक्रमामुळे चिखले समुद्र किनारी शेकडो रोपे जगविण्यात यश
डहाणू तालुक्यातील चिखले समुद्र किनारी ताडबिया रोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमामुळे आजतागायत चिखले समुद्र किनारी शेकडो रोपे जगविण्यात यश आले आहे.
या उपक्रमात बोर्डी वन विभाग, वाईल्डलाईफ कंन्झर्व्हेशन अँड एनिमल वेल्फेअर असोसिएशन, समुद्रकाष्ठ मित्र मंडळ, पक्षी आणि समुद्री कासव प्रेमी, स्थानिक पर्यावरण प्रेमी सहभागी झाले होते. या झाडांच्या रोपांची उपलब्धता, लागवड, खत व जल व्यस्थापन आणि कुंपणावर शून्य खर्च येतो. तसेच या झाडांच्या झावळ्यांचा उपयोग घरबांधणीसाठी देखील केला जातो. ताडी उद्योग आणि निऱ्यापासून गूळ निर्मितीद्वारे रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.
राज्यातील सागरी किनाऱ्यांवर स्थानिकांकडून स्वयं स्फुर्तीने राबविला जाणारा हा अभिनव उपक्रम आहे. या उपक्रमामुळे वृक्षांच्या संवर्धनामध्ये मदत होईल तसेच पाणथळ व अन्य पक्षांकरिता अधिवास पोषक वातावरण निर्माण होणार आहे. यावेळी कासव व पक्षी निरीक्षक गटाने अभियानात भाग घेऊन पर्यावरण प्रेमींना मार्गदर्शन केले.