पालघर - कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. राज्यातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. धारावी येथून एक व्यक्ती मोटारसायकलने बोईसर येथे पोहचला. या व्यक्तीबाबत समाजमाध्यमांमध्ये विविध संदेश प्रसारित झाले आहेत. मात्र, या व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणे नसून खबरदारीचा उपाय म्हणून त्याच्या घशाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
धारावीतून बोईसरला आलेला व्यक्ती ग्रामीण रुग्णालयात; कोरोनाची लक्षणे नाहीत, अफवा पसरवल्यास कारवाई
धारावी येथून एक व्यक्ती मोटारसायकलने बोईसर येथे पोहचला. या व्यक्तीबाबत समाजमाध्यमांमध्ये विविध संदेश प्रसारित झाले आहेत. मात्र, या व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणे नसून खबरदारीचा उपाय म्हणून त्याच्या घशाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
धारावी येथून एक व्यक्ती मोटरसायकलने ५ एप्रिल रोजी पालघर तालुक्यातील बोईसर येथे आपल्या भावाकडे राहण्यासाठी आला. या व्यक्तीला खोकला असल्यामुळे बोइसर येथील एका खासगी डॉक्टरांकडे तपासणीसाठी गेला. खासगी डॉक्टारांनी रुग्णाच्या लक्षणांची आणि तब्येतीची पूर्ण माहिती जिल्हा आरोग्य प्रशासनाला दिली. त्यानंतर आरोग्य पथकामार्फत या व्यक्तीची तपासणी करून खबरदारीचा उपाय म्हणून या त्याला पालघर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या व्यक्तीमध्ये कोरोनाची ठराविक लक्षणे नसून त्याला फक्त खोकला असल्याचे समजते. परंतु, तरीही खबरदारीचा उपाय म्हणून या व्यक्तीच्या घश्याचे नमुने कोरोना तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिजित खंदारे यांनी आरोग्य विभागाकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. मात्र, तपासणी अहवालानंतरच रुग्णाची स्थिती स्पष्ट होणार आहे.
समाजमाध्यमांवर सदर रुग्णांबाबत विविध अफवा पसरवण्यात येत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. समाज माध्यमांमध्ये अशाप्रकारे अफवा पसरवल्यास संबधितांवर गुन्हा दाखल करत कारवाई करण्यात येईल, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.