पालघर -जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या जव्हार-मोखाडा भागात पाण्याची बचत आणि आधुनिक पद्धतीने मल्चिंग पेपरचा वापरकरून 86 ठिकाणी 26 हजार स्ट्रॉबेरींची लागवड केली आहे.
यात मोखाडा तालुक्यात 42 ठिकाणी तर, जव्हार तालुक्यात 44 ठिकाणी 11 एकर क्षेत्रावर 26 हजार स्ट्रॉबेरीच्या झाडांची प्रायोगिक तत्वावर लागवड झाली आहे. पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गमात असलेला आणि रोजगारासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा फिरणारा आदिवासी बांधव आपल्या शेतात स्ट्रॉबेरीचे प्रयोग करत आहे.
पालघर जिल्ह्यातील जव्हार आणि मोखाडा या अतिदुर्गम आदिवासी भागातील शेतकरी पारंपरिक नाचणी, वरईची शेती करतात. या व्यतिरिक्त दुसरी कोणतीही पिके घेतली जात नाहीत. रोजगार नसल्यामुळे येथे बेरोजगारी वाढली आहे. उपजीविकेसाठी मोठ्या प्रमाणात आदिवासी कुटुंबं शहराकडे स्थलांतर करत आहेत. त्यामुळे काही वर्षांपासून हे तालुके कुपोषण, बालमृत्यूमुळे चर्चेत आले आहेत. मात्र, आता आदिवासी शेतकरी स्वतः आधुनिक शेतीकडे वळले आहेत. त्यांनी यावेळी स्ट्रॉबेरीच्या झाडांची लागवड करून आपला आर्थिक स्तर उंचावण्याचा प्रयत्न केला आहे.
आदिवासी समाजातील शेतकऱ्यांना सापुतारा येथे प्रशिक्षण -
आदिवासी शेतकऱ्यांना एकत्र करून सापुतारा येथे सहल नेत आदिवासींना स्ट्रॉबेरीच्या झाडांची लागवड करण्याचे प्रशिक्षण दिले गेले. येथील कृषी अधिकारी अनिल गावित यांनी शेतकरीवर्गाला एकत्र करत हा प्रयोग साध्य करण्याचा प्रयत्न केला आहे. गावित यांनी या अगोदर सुरगाणा तालुक्यात हा प्रयोग यशस्वी केला आहे. तोच स्ट्रॉबेरी प्रयोग जव्हार-मोखाडामध्ये राबवण्याचा प्रयत्न केला आहे.