पालघर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या शाळा बंद आहेत, यामुळे ऑनलाइन वर्ग भरविण्याचा निर्णय सरकारने घेतला. मात्र, अनेक ठिकाणचे विद्यार्थी या ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहत आहेत. तलासरी तालुक्यातील सुत्रकार गावातील विद्यार्थ्यांचीही हीच अवस्था आहे. मात्र, येथील शिक्षक विवेकानंद देसले यांनी ऑनलाइन शिक्षणापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना कोरोनाचे सर्व नियम पाळत मागील वर्षी शेतातच शैक्षणिक धडे दिले होते. आता पावसाळा असल्याने ते गावातील मंदिरात, त्याचप्रमाणे गावकऱ्यांच्या घरासमोरील पत्र्याच्या शेडखाली या विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देतात.
हेही वाचा -वसईच्या 'त्या' संशयीत बोटीची अखेर पटली ओळख ; 26 तासानंतर खलाशाची सुटका
आदिवासी, दुर्गम भागातील विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणापासून वंचित
सुत्रकार गावातील महाराष्ट्र विद्या मंदिर येथील शिक्षक विवेकानंद देसले यांनी सर्व प्रथम पाड्यांवर भेटी देऊन विद्यार्थ्यांचे फोननंबर, तसेच व्हॉट्सअॅप नंबर घेऊन त्याद्वारे विद्यार्थ्यांचा अभ्यास घेऊन त्यांना शिकवण्याचा प्रयत्न केला. पण, पालघर जिल्ह्यासारख्या आदिवासीबहुल ग्रामीण भागात मोबाईल नेटवर्क, इंटरनेट, पालकांकडे अँड्रॉइड मोबाइल, लॅपटॉप नसल्याने ऑनलाइन शिक्षण आदिवासी मुलांपर्यंत पोहोचविणे कठीण असल्याचे देसले यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी स्वतः लिहून तयार केलेल्या स्वाध्याय पुस्तिकेच्या झेरॉक्स प्रती मुलांना दिल्या. पण, काहीच न शिकवता मुलांना स्वाध्याय सोडवण्यास अडचणी येत होत्या.