पालघर- जिल्ह्यातील वाडा पोलीस ठाण्यामधील कथित तिहेरी हत्याकांडातील 55 वर्षीय आरोपीला कोरोना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याआधी वाडा तालुक्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नव्हता. मात्र, आता पोलिस कोठडीतील आरोपीला कोरोनाची लागण झाल्याने वाडामध्ये कोरोनाने शिरकाव केला आहे. या कोरोनाबाधित आरोपीला उपचारासाठी पालघर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पालघर हत्याकांडातील आरोपीला कोरोनाची लागण; वाडा शहरात 7 मेपर्यंत कडकडीत बंद
खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने 3 मे ते 7 मेपर्यंत वाडा शहर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती वाडा तहसीलदार उद्धव कदम यांनी दिली आहे.
दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने 3 मे ते 7 मेपर्यंत वाडा शहर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती वाडा तहसीलदार उद्धव कदम यांनी दिली आहे. तर आरोपी रुग्णाच्या संपर्कातील एकूण 52 जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. यामध्ये 23 आरोपींचा व 29 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यातील 19 पोलिसांना वाडयात एका ठिकाणी क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती वाडा ग्रामीण रुग्णालयाचे वैधकीय अधीक्षक प्रदीप जाधव यांनी दिली आहे.
पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील कासा पोलीस ठाण्यांतर्गत गडचिंचले येथील कथित 3 प्रवाशांच्या हत्येप्रकरणातील अटकेतील काही आरोपींची रवानगी ही वाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. यामधील 55 वर्षीय आरोपीची कोरोना चाचणी घेण्यात आली असता, आरोपीचा अहवाल पॉझेटिव्ह आला आहे.