वसई (पालघर) : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कचऱ्यासोबतच आता त्यांना आगी लागण्याचे प्रकार घडू लागले आहेत. त्यामुळे महामार्गावर धुराचे साम्राज्य तयार होत असल्याने येथून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांचा कोंडमारा होऊ लागला आहे.
वसई पूर्व भागातून मुंबई-अहमदाबाद महामार्ग गेला आहे. या महामार्गालगतच मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जाऊ लागला आहे. अधूनमधून या कचऱ्याला आगी लावण्याचे प्रकारही आता सुरू झाले आहेत. या आगीमुळे सर्वत्र धूर मोठ्या प्रमाणात पसरू लागला आहे. त्यामुळे याचा त्रास येथून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांसह येथे राहणाऱ्या स्थानिक नागरिकांना होऊ लागला आहे. हा कचरा विविध ठिकाणच्या कारखान्यातील टाकाऊ कचरा आहे. यामध्ये बहुतांश रासायनिक कचरा असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले आहे. या कचऱ्याला आगी लावल्याने दुर्गंधीयुक्त धूर संपूर्ण दिवस-रात्र येथील परिसरात धुमसत असतो. यावर महापालिका व महामार्ग प्राधिकरण यांचे कोणाचेही नियंत्रण नसल्याने या प्रकारात दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे.
वसईत आगीच्या दुर्गंधीयुक्त धुरामुळे महामार्गावर वाहनचालकांचा कोंडमारा
वसई पूर्व भागातून मुंबई-अहमदाबाद महामार्ग गेला आहे. या महामार्गावर विविध ठिकाणच्या कारखान्यातील रासायनिक कचरा टाकण्यात येत आहे. तसेच या कचऱ्याला आग लावण्यात येत असल्याने महामार्गावर धुराचे साम्राज्य पसरत आहे. याचा त्रास येथील नागरिक व वाहनचालक यांना होत आहे.
कधी कधी हवेमुळे आगीचा धूर एवढा पसरतो की, समोरचे वाहनही दिसत नाही. विशेष करून, रात्रीच्या सुमारास ही समस्या अधिकच गंभीर बनत असते. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. यासाठी आगी लावून प्रदूषण पसरविणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
नागरिकांचे आरोग्य धोक्यात
महामार्गाच्या कडेला टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे, काही अवजड वाहनचालक विश्रांतीसाठी रस्त्याच्या कडेला थांबतात. परंतु आगीचा धूर, कचऱ्याची दुर्गंधी नाका-तोंडात जाऊन त्रास होत असतो, अशा प्रकारा मुळे श्वसनाचे गंभीर आजारही होऊ शकतो.