पालघर - केंद्र सरकारच्या प्रस्तावित वाढवण बंदराविरोधात वाढवण बंदरविरोधी संघर्ष समितीने पुकारलेल्या बंदला आज पश्चिम किनारपट्टीवरील गावांमध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद पहायला मिळाला. या बंदच्या पार्श्वभूमीवर स्थानिकांनी एकत्र येत जवळपास 5 किलोमीटर लांबीची मानवी साखळी तयार केली. केंद्र सरकारच्या प्रस्तावित वाढवण बंदराचा निषेध म्हणून स्थानिकांकडून वाढवण बंदराचे श्राद्ध घालत मुंडनही करण्यात आले.
वाढवण बंदर उभारल्यास याचा मोठा फटका येथील स्थानिक मच्छीमार, शेतकरी, भूमिपुत्रांना बसणार आहेच. मात्र पर्यावरणाचाही र्हास होईल, अशी भीती स्थानिकांकडून व्यक्त करण्यात येत असून हे बंदर रद्द करावे, अशी मागणी करण्यात येत आहे
वाढवण बंदराच्या विरोधातील बंदला उत्सफूर्त प्रतिसाद वाढवण बंदराच्या निषेधार्थ पिंडदान व श्राद्ध -
वाढवण बंदराविरोधात आज किनारपट्टीवरील गावांमध्ये बंद पुकारण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आज वाढवण येथे स्थानिकांनी एकत्र या केंद्र सरकारचा व वाढवण बंदर याचा निषेध म्हणून पिंडदान करून श्राद्ध घातले तसेच मुंडनही केले. त्याचप्रमाणे स्थानिकांनी एकत्र येत जवळपास 5 किलोमीटर लांबीची मानवी साखळी तयार केली.
वाढवण बंदर विरोधात बंद -
वाढवण बंदर विरोधात करण्यात आलेल्या बंदला मुंबईतील कफ परेड ते महाराष्ट्राचे शेवटचे टोक असलेल्या झाईपर्यंत कोळीवाडे तसेच किनारपट्टीवरील गावांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला असून जवळपास 56 गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. यावेळी मच्छी मार्केट तसेच भाजी मार्केटमध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला असून देशपातळीवरील मच्छिमार संघटना, पालघर मधील स्थानिक संघटना तसच रिक्षाचालक-मालक संघटनांनी देखील सहभाग घेतला.
वाढवण काय आहे बंदर प्रकल्प -
केंद्रीय नौकानयन व बंदर मंत्रालयाने डहाणू तालुक्यातील वाढवण येथे बंदर उभारणीचा प्रस्तावित आहे. वाढवण बंदर हे आशिया खंडातील सर्वात मोठे बंदर तसेच जगातील सर्वोत्कृष्ट १० बंदर अशी या बंदाराची रचना आहे. हे बंदर बनवण्यासाठी २२ मीटर खोल समुद्रामध्ये ५ हजार एकराचा भराव करावा लागणार आहे.
बंदर उभारणीस स्थानिकांचा विरोध -
वाढवण बंदर उभारणीमुळे वाढवण, वरोर, धाकटी डहाणू, बाडा पोखरणसह अनेक गावे विस्थापित होणार असून स्थानिकांच्या जमिनी देखील घेतल्या जाणार आहेत. वाढवण बंदर हा भाग पर्यावरणीयदृष्ट्या अतिसंवेदनशील विभाग असून येथील समुद्र हा मत्स्यबीज उत्पादनाचे प्रमुख केंद्र आहे. या बंदराची उभारणी झाल्यास शेती, बागायती, डायमेकर व्यवसाय नामशेष होणार आहे. मच्छीमारी देखील उध्वस्त होऊन जाणार आहे. तसेच ५ हजार एकर समुद्रात भराव टाकला जाणार असल्याने अडणारे पाणी खाड्यांतून गावात जाऊन गावेच्या गावे समुद्रात गडप होण्याची भीती इथले नागरिक व्यक्त करत आहेत. महाकाय बंदराची व्यापकता, नष्ट होणारी बागायती शेती, किनारपट्टीतील लक्षावधी तिवरीची झाडे, समुद्रातील बीजोत्पादन खडकाळ प्रदेश, मोठ्या मालवाहू बोटीच्या वर्दळीमुळे मासेमारी क्षेत्र संपुष्टात येणार असून परिसरातील जैवविविधता मासेमारीवर मोठा परिणाम होणार असून या वाढवण बंदर उभारणीला स्थानिक ग्रामस्थांचा आणि मच्छीमारांचा तीव्र विरोध आहे.