पालघर - लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकून पडलेल्या उत्तरप्रदेश राज्यातील 1 हजार 600 कामगारांना घेऊन सोमवारी पालघर रेल्वे स्थानकातून विशेष श्रमिक रेल्वे जौनपूरसाठी रवाना झाली. यावेळी पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे, पालघरचे उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी वाघमारे, तहसीलदार सुनील शिंदे, यांच्यासह आरोग्य विभाग, पोलीस, रेल्वे प्रशासनाचे लोहमार्ग पोलीस अधीक्षक, अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती. उपस्थितांनी आपल्या गावी परत जाणाऱ्या मजुरांना शुभेच्छा दिल्या आणि टाळ्या वाजवून या विशेष रेल्वेला रवाना करण्यात आले. या प्रवाशांनी आपल्या मूळगावी जात असताना महाराष्ट्र शासन आणि स्थानिक प्रशासनाचे आभार मानले.
उत्तर प्रदेशातील कामगारांना घेऊन पालघर रेल्वे स्थानकातून विशेष श्रमिक रेल्वे रवाना - palghar to jaunpur special train
तिसऱ्या टप्प्यातल्या लॉकडाऊन दरम्यान परराज्यातील नागरिकांना घरी पाठवण्यास परवानगी मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी जिल्ह्यात अडकलेल्या उत्तरप्रदेश राज्यातील कामगार व मजुरांना घरी पाठवण्यासाठी पालघर ते जौनपूर या विशेष रेल्वेची सुविधा करुन त्यांना रवाना करण्यात आले.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र, यामुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली. त्यामुळे रखरखत्या उन्हात अनेक कामगारांनी पायपीट करत आपल्या मूळगावी जाण्याचा रस्ता धरला होता. मात्र, तिसऱ्या टप्प्यातल्या लॉकडाऊन दरम्यान परराज्यातील नागरिकांना घरी पाठवण्यास हिरवा कंदील मिळाला आहे.
जिल्ह्यात अडकलेल्या उत्तरप्रदेश राज्यातील कामगार व मजुरांना घरी पाठवण्यासाठी पालघर ते जौनपूर या विशेष रेल्वेची सुविधा करण्यात आली. जिल्ह्यात अडकलेल्या या सर्व मजुरांना बसने पालघर रेल्वे स्थानकात आणण्यात आले. त्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करून गाडीमध्ये बसवण्यात आले. पालघरमधील प्रशासनाच्या व निऑन फाउंडेशन तसेच जैन समाजाकडून चालवल्या जाणाऱ्या कम्युनिटी किचनमार्फत या सर्व प्रवाशांची भोजनाची व्यवस्था करण्यात आली. उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात आपल्या गावी परत जाणाऱ्या या कामगार व मजुरांना निरोप दिला.