पालघर - जिल्ह्यातील सागरी क्षेत्रात एका दुतोंडी शार्क माशाच्या प्रजातीची नोंद करण्यात आली आहे. सातपाटी येथील नितीन पाटील या मच्छीमाराला हा दुतोंडी शार्क मासा आढळून आला. 'स्पेड नोझ शार्क' (छोटी मुशी) प्रजाती अतिशय दुर्मिळ असल्याने सध्या हा मासा चर्चेचा विषय बनला आहे.
सातपाटी येथे आढळला दुतोंडी शार्क 'स्पेड नोझ शार्क' जिल्ह्यातील मासेमारीसाठी प्रसिद्ध असलेल्या सातपाटी येथील मच्छीमार नितीन पाटील हे मच्छिमारी नौका घेऊन समुद्रात मासेमारीसाठी गेले असता त्यांना जवळपास 6 ते 8 इंच लांबीचे दुतोंडी शार्कचे पिल्लू आढळले. त्यांनी माशाचे फोटो काढून या माशाला पुन्हा समुद्रात सोडले. तसेच, याबद्दलची माहीती त्यांनी 'केंद्रीय समुद्री मात्स्यिकी संस्थे'च्या (सीएमएफआरआय) शास्त्रज्ञांना पाठवली.
माणसांबरोबरच प्राण्यांच्या इतर प्रजातींमध्ये देखील अशाप्रकारचे दोन तोंडे असल्याची उदाहरणे आपल्याला दिसून येतात. मादीच्या गर्भामध्ये बदल झाल्याने असे दुतोंडी जीव जन्माला येत असतात. अशा प्रकारच्या दुतोंडी प्रजाती प्रौढ अवस्थेपर्यंत जीवंत राहत नाहीत. कारण, अशा प्रजातींमध्ये दोन मेंदू असल्यामुळे अन्नाची शिकार करताना बरीच गुंतागुंत होते अशी माहिती प्राध्यापक व जैवविविधतेचे अभ्यासक भूषण भोइर यांनी दिली. तसेच, दुतोंडी शार्क आढळणे ही अत्यंत दुर्मिळ अशी घटना असल्याची पुष्टी सीएमएफआरआय वैज्ञानिक आणि इतर सागरी जीवशास्त्रज्ञांनी केली आहे.
सीएमएफआरआय शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, दोन डोक्याचा शार्क फारच कमी प्रमाणात आढळत असून महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्रात असा मासा आढळण्याची बहुदा पहिलीच घटना असावी. कोणत्याही भ्रुण विकृतीमुळे, विकारांमुळे हे अत्यंत दुर्मिळ असे पिल्लू जन्माला आले असावे असे सांगण्यात येत आहे. मात्र, यामागचे नेमके कारण काय हे रहस्य असून मत्स्यवैज्ञानिक हिताच्या दृष्टीने अशा माशाचे जतन करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे मच्छीमारांनी अशा प्रकारच्या जीवांचे नमुने सापडल्यास त्याची माहिती सागरी शास्त्रज्ञांना देणे आवश्यक आहे. जेणेकरुन या दुर्मीळ जीवांच्या नोंद करता येईल आणि भविष्यात त्याचा संशोधनामध्ये उपयोग होईल.