पालघर - अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली गुजरातमधून महाराष्ट्रात गुटखा वाहतूक होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. लॉकडाऊन असताना भाजीपाल्याच्या गाडीतून गुटख्याची तस्करी होत असल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. सातिवली येथे मनोर पोलिसांनी 15 लाख रुपये किंमतीचा गुटखा व 20 लाख रुपये किमतीचा ट्रक असा एकूण 35 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
भाजीपाल्याच्या ट्रकमधून गुटख्याची तस्करी; 15 लाखांच्या गुटख्यासह 35 लाखांचा मुद्देमाल जप्त
भाजीपाल्याच्या ट्रकमधून गुटख्याची तस्करीचा मनोर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी 15 लाख रुपये किंमतीचा गुटखा आणि 20 लाख रुपये किंमतीचा ट्रक असा एकूण 35 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गुजरातमधून महाराष्ट्रात भाजीपाला घेऊन येणाऱ्या ट्रकचा मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील नजीक सातिवली येथे चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक पलटी होऊन अपघात झाला. अपघात झालेल्या ट्रकमध्ये भाजीपाल्यात मोठ्या प्रमाणात गुटखा लपवून ठेवण्यात आला होता. अपघातानंतर चालक पसार झाला असून या ट्रकमधून सुमारे 15 लाख रुपये किंमतीचा गुटखा आणि 20 लाख रुपये किंमतीचा ट्रक असा एकूण 35 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल मनोर पोलिसांनी जप्त केला आहे. संबंधित गाडीचे मालक आणि चालकावर मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.