पालघर- पालघरच्या मुरबे येथील सिद्धेश्वरी उर्फ गौरी हितेंन पागधरे या 16 वर्षीय तरुणीची मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या 19 वर्षाखालील महिला क्रिकेट संघात यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून निवड करण्यात आली आहे.
मूळ सातपाटीच्या पण व्यवसायाच्या निमित्ताने मुरबे येथे स्थायिक झालेल्या ज्योती आणि हितेन पागधरे या दाम्पत्याची सिद्धेश्वरी ही मोठी मुलगी. आपल्या शालेय जीवनात मुरबे येथे मुलांच्या क्रिकेट सामन्यांत तिने सहभाग घेतला. यावेळी स्क्वेअर कट, स्ट्रेट ड्राइव्ह, हुक, पूल असे फटके सहजरित्या मारत असल्याने तिला चांगल्या मार्गदर्शकाची गरज असल्याचा सल्ला अनेकांनी तिच्या वडिलांनी दिला. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सिद्धेश्वरीने शतके ठोकली व चांगली कामगिरी केली. मात्र सिद्धेश्वरीमध्ये गुणवत्ता असल्याने तिला टेनिस पासून दूर करून लेदर क्रिकेटकडे वळविण्याचा सल्ला तिच्या वडिलांना अनेकांनी दिला.
सिद्धेश्वरीला लेदर बॉल क्रिकेटकडे वळविण्यासाठी वडिलांनी तिला बोईसर येथील टाटा स्टील मैदानात क्रिकेटचे प्रशिक्षण देण्याचे ठरविले. तेथे प्रशिक्षक जगदीश नाईक, झाकिर शेख, भरत चामरे या प्रशिक्षकांच्या देखरेखीखाली तिचा खडतर सराव सुरू झाला. सरावा दरम्यान प्रशिक्षक नाईक यांनी तिला यष्टीरक्षण करण्याचा सल्ला दिला.
शिवाजी पार्क येथे झालेल्या शालेय स्पर्धेतील उपांत्य फेरीतल्या सामन्यात सिद्धेश्वरीने चांगले यष्टीरक्षण करीत संघाला जिंकण्यासाठी हव्या असणाऱ्या धावसंख्येचा पाठलाग करताना नाबाद 25 धावा केल्या फलंदाजीतील चुणूक दाखवीत आपल्या संघाला विजयी केले. महिला क्रिकेटमध्ये अशीच चांगली कामगिरी करत विरार येथे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या महिला संघासाठी झालेल्या सराव स्पर्धेत एकूण 104 धवांसह यष्टीरक्षणात सिलेक्टर्सना चांगलेच प्रभावित केल्याने सिद्धेश्वरीची निवड करण्यात आली.
महिला क्रिकेटमध्ये अशीच चांगली कामगिरी करत महिला रणजी संघात तसेच भारताचे प्रतिनिधित्व करण्याची आपली इच्छा असून आपले स्थान निश्चित करण्यासाठी मी कसून सराव करीत असल्याचे सिद्धेश्वरीने सांगितले आहे.