पालघर- रेशन कार्ड आणि जीवनावश्यक वस्तूंच्या हक्कासाठी २६ मेपासून जिल्ह्यातील तहसीलदार कार्यालयासमोर "हक्काग्रह" आंदोलन सुरू आहे. या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर श्रमजीवी संघटनेचे विवेक पंडीत यांनी आंदोलनात सहभागी होत अटक करण्याची मागणी केली. त्यानंतर मात्र प्रशासनाने इतर आंदोलकांना सोडून दिले.
आंदोलनाचा दुसरा दिवस असून शांततेत आणि शासनाचे सर्व नियम पाळून आंदोलन सुरू होते. डहाणू तहसीलदार कार्यालयासमोर सुरू असलेल्या धरणे आंदोलनातील श्रमजीवीच्या 31 आंदोलकांना डहाणू पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी अचानक केलेल्या कारवाईमुळे श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित हे आंदोलनात सहभागी झाले. त्यानंतर मात्र प्रशासनाने बचावात्मक पवित्रा घेत आंदोलकांना सोडून दिले.