पालघर- जिल्ह्यातील आदिवासी भागात सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे. या ठिकाणी रुग्णालय, चांगले रस्ते व रोजगार याची कमतरता आहे. लग्नं आम्ही लावून देऊ मात्र, सरकारने येथील स्थानिकांना रोजगार उपलब्ध करुन द्यावा, असा टोला शर्मिला ठाकरे यांनी सरकारला लगावला ( Sharmila Thackeray Criticism on Government ) आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ( MNS ) पुढाकाराने पालघर जिल्ह्यातील विक्रमगड येथे सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. याठिकाणी शर्मिला ठाकरे या आल्या असताना माध्यमांशी त्या बोलत होत्या. या विवाह सोहळ्यात 750 हून अधिक जोडप्यांचे लग्न झाले.
अनेक आदिवासी, शेतकरी, गरीब गरजू कुटुंबांना आपल्या पाल्यांचा लग्न सोहळा आर्थिक अडचणींमुळे थाटामाटात साजरा करता येत नाही. त्याचप्रमाणे कोरोना काळात अनेकांचे विवाह ठप्प झाले असून थाटामाटात लग्नासाठी आर्थिक भुर्दंड सोसण्याची ताकत आता गरिबांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. या पार्श्वभूमीवर मनसेच्या वतीने या कुटुंबाना हातभार लागावा व त्यांच्या पाल्यांचा लग्न सोहळाही थाटामाटात पार पडावा यासाठी मनसेच्या वतीने या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येत असल्याचे मनसे पालघर ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी सांगितले.
शर्मिला ठाकरे यांनी प्रातिनिधिक स्वरूपात केले एका वधुचे कन्यादान -पालघर जिल्ह्यातील विक्रमगड ग्रामीण रुग्णालयाजवळील सूरकर मैदानात सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन रविवार ( दि. 13 मार्च ) रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आले. साडेसातशेहून अधिक जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा संपन्न झाला. या सामूहिक विवाह सोहळ्याला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी उपस्थित राहून नवदांपत्यांना आशीर्वाद दिले. शर्मिला ठाकरे यांनी यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात एका नवदांपत्याचे कन्यादानहीकेले.