पालघर/वसई -नालासोपारा पूर्वेतील संतोषभवन भागातील लशावीर देवस्थान जवळच्या नागरी वस्तीत गटाराचे सांडपाणी रस्त्यावर येऊ लागले आहे. हे सांडपाणी रस्तावरच साचून राहत असल्याने घाणीचे साम्राज्य तयार होऊ लागले आहे. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतर प्रशासन जागे होणार?
नालासोपारा पूर्वेतील परिसरात संतोष भवन परिसर आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती आहे. या लगतच असलेल्या गोठ्यातून येणारे सांडपाणी थेट रस्तावर येऊ लागले आहे. मागील काही महिन्यांपासून असाच प्रकार सुरू आहे. त्यामुळे येथून ये जा करणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. यावर महापालिकेकडून अजूनही कोणत्याच उपाययोजना करण्यात येत नसल्याने येथील गटाराच्या सांडपाण्याची समस्या अधिकच जटिल बनू लागली आहे.
गटाराची झाकणे उघडी
दुसरीकडे जी गटारे याभागात तयार केली आहेत. त्यावरील झाकणे ही उघड्याच स्थितीत आहे. नुकताच एक लहान मुलगा या भागात उघड्या गटारात पडल्याची घटना घडली होती. सुदैवाने नागरिकांच्या प्रसंगावधनामुळे त्या मुलाला वेळीच बाहेर काढण्यात आले. या उघड्या गटारात पडून एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतर पालिका प्रशासन जागे होणार का असा प्रश्न येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे. या भागात आजही योग्य त्या सोयीसुविधा मिळाल्या नाहीत. यासाठी पालिकेने गटाराचे सांडपाणी व उघडी गटारे याकडे लक्ष देऊन योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
साथीचे आजार वाढण्याची भीती
या भागातील रस्त्यावरच सातत्याने गटाराचे पाणी वाहत आहेत. या वाहत्या पाण्यातूनच येथील नागरिक, लहान मुले या सर्वांना ये-जा करावी लागते. तर दुसरीकडे घाणीमुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटकाळात मलेरिया, डेंग्यू, न्यूमोनिया, ताप येणे असे आजार बळावण्याची दाट शक्यता आहे.
स्वच्छता निरीक्षकांना पाठवून करणार पाहणी
ज्या ठिकाणी गटाराचे सांडपाणी रस्त्यावर सोडले जात आहे. त्याठिकाणी स्वच्छता निरीक्षकांना पाठवून पाहणी करण्यात येईल. त्यानुसार पुढील उपाययोजना केल्या जातील, असे घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छता विभाग अधिकारी नीलेश जाधव म्हणाले.