पालघर -नालासोपारा येथे अकरावीत शिकणाऱ्या एका १७ वर्षीय मुलीवर पाच नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याच्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. नराधमांनी पीडित मुलीचे अपहरण करून तिला एका खोलीत डांबून ठेवले होते. येथे तिच्यावर आळीपाळीने बलात्कार करण्यात आला. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मार्निंग वॉकला गेलेल्या १७ वर्षीय तरुणीचे अपहरण करून पाच जणांचा सामूहिक बलात्कार - Palghar crime news
नालासोपारा येथील अकरावीत शिकणाऱ्या एका १७ वर्षीय मुलीवर पाच जणांनी अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
शनिवारी सकाळी नालासोपारा पूर्व येथे सदर पीडित मुलगी एका मित्रासोबत सकाळी मॉर्निग वॉकसाठी गेली होती. यावेळी पाच तरूणांनी चाकूचा धाक दाखवत पीडित मुलीचे अपहरण केले. तिच्यासोबत असलेल्या मित्रावरही अपहरणकर्त्यांनी हल्ला चढवला. अपहरणकर्त्यांनी यावेळी एका रिक्षाचा वापर करत तिला पळवून नेत एका खोलीत डांबून ठेवले. त्यानंतर आळीपाळीने तिच्यावर अमानुष अत्याचार केला. याबाबत मुलीच्या जखमी मित्राने तुळींज पोलीस ठाण्याशी संपर्क साधत अपहरणाची माहिती दिली.
तुळींज पोलिसांनी याबाबत घटनास्थळी पोहचत पीडित मुलीच्या जखमी मित्राची जबानी घेतल्यावर त्याला रूग्णालयात दाखल केले आहे. तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दत्तात्रय पाटील यांनी याबाबत पाच जणांवर अपहरण व सामूहिक बलात्कार केल्याच्या गुन्हाबद्दल कलम 376 (2) (एन) 376 (डी) 365,377,386 बाल कायदा अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी कैलास संतोष वीर (वय 19) , रोहित जयभगवान तन जोटकर उर्फ मेंटल (वय 20) या दोघा आरोपींना अटक केली असून इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे.