पालघर-नालासोपाऱ्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. सोमवारी शहरातील दोन रुग्णालयांमध्ये मिळून दहा गंभीर रुग्णांचा मृत्यू झाला. यापैकी विनायक रुग्णालयात दिवसभरात ७, तर रिद्धीविनायक रुग्णालयात तीन जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. दरम्यान, ऑक्सिजनच्या कमतरतेमुळेच या रुग्णांचे मृत्यू झाल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे. मृत रुग्णांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त करत रुग्णालयात गोंधळ घातला. अखेर उशिरा रात्री पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर जमाव शांत झाला.
नालासोपाऱ्यातील विनायक हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार केले जात आहेत. या रुग्णालयात 7 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने या रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. रुग्णांच्या नातेवाईकांनी रात्री उशिरा हॉस्पिटलबाहेर गोंधळ घातला. अखेर तुळींज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जमावाला समजावून शांत केले.
हेही वाचा -मुख्यमंत्र्यानी घेतला मुंबईमधील कोरोना परिस्थितीचा आढावा
रुग्णालयात पुरेसा ऑक्सिजन साठा होता; पोलिसांचं स्पष्टीकरण..
पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पालघर जिल्ह्यातील दोन रुग्णालयांमध्ये १० कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रुग्णांचे मृत्यू झाल्याची अफवा पसरली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक रुग्णालयात जमा झाले होते. एका रुग्णालयात सात कोरोनाबाधित दगावले आहेत. त्यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे. तर दुसऱ्या रुग्णालयात तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. कोणताही अनुचित प्रसंग घडू नये, यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तुळींज आणि नालासोपारामधील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून परिस्थितीवर जवळून देखरेख ठेवण्यात येत असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.