पालघर (वाडा)- बोईसर येथील दांडी समुद्र किनाऱ्यावर दुर्मिळ असणारा समुद्रीघोडा सापडला आहे. या समुद्रीघोड्याला पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली आहे. या समुद्रीघोड्याची चर्चा आता संपूर्ण जिल्हाभर पसरली आहे.
दांडी समुद्र किनाऱ्यावर सापडला समुद्रघोडा बोईसरच्या दांडी समुद्र किनाऱ्यावर मितेश धनु हे आपल्या कुटुंबासह गेले होते. यावेळी त्यांना समुद्र किनाऱ्यावर दुर्मिळ असा समुद्रीघोडा सापडला. जगभरात सीहॉर्स म्हणून प्रसिद्ध असलेला हा एक विचित्र दिसणारा जलचर आहे. इंग्रजी ‘एस’ या अक्षराप्रमाणे त्याचा आकार असतो. हा दुर्मिळ समुद्रीघोडा सध्या त्यांनी स्वत:च्या घरी आणला असून मितेश त्याची काळजी घेत आहेत.
सध्या उष्ण वातावरण असल्यामुळे तो समुद्र किनाऱ्यावर आढळला. तसेच या जलचरामध्ये मादीऐवजी नर पिलांना जन्म देतो. त्याच्या पोटाला कांगारू सारखी पिशवी असते. यामध्ये तो ही अंडी ठेवतो. अंडी दिल्यानंतर चार ते पाच आठवड्यात तो पिल्लांना जन्म देतो. अशाप्रकारे तो वर्षभरात तीनवेळा पिलांना जन्म देतो.
या समुद्रीघोड्याची लांबी जवळपास ३ ते ४ सेंटीमीटर असून, तो ४ ते ५ रंगात आढळतो. मितेश यांना आढळलेला समुद्रीघोडा हा चॉकलेटी रंगाचा आहे. त्यांना या समुद्रीघोड्याच्या प्रजातीची कोणतीही माहिती नसून शास्त्रीयदृष्ट्या हा जलचर हिप्पोकॅम्पस या गटातला आहे. त्याच्या जवळपास ५० प्रजाती आढळतात. मितेश धनु यांनी या समुद्रीघोड्याला घरी आणून त्याला खाऱ्या पाण्यात ठेवले आहे. त्याला काय खाऊ घालायचे याबाबत काहीच माहिती नसल्याने ते आता त्याला पुन्हा समुद्रात सोडणार आहेत.