पालघर: (Palghar) जिल्हा परिषद शाळा कर्दळ (Z P Kardal School ), ही सफाळे परिसरातील उपक्रमशील शाळा असून, या शाळेत शिक्षकांनी शालेय विद्यार्थी मंत्रिमंडळ डिजिटल मतदान प्रक्रिया (School Student Cabinet Digital Voting) प्रत्यक्ष EVM द्वारे म्हणजेच EVM यंत्र असलेल्या मोबाईल एप्लिकेशन्द्वारे ऑनलाईन पद्धतीने घेतली. शाळेतील सर्व शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन प्रत्यक्ष निवडणुकांच्या धरतीवर नियोजनबद्ध राबविलेल्या या प्रक्रियेत निवडून आलेल्या विद्यार्थी प्रतिनिधींचा जाहीरपणे शाळेत शपथविधी झाला.
शालेय विद्यार्थी मंत्रिमंडळ डिजिटल मतदान प्रक्रिया 2022 :कर्दळ शाळेत उपक्रमांचा शनिवार म्हणून रंगलेल्या 'शालेय विद्यार्थी मंत्रिमंडळ डिजिटल मतदान प्रक्रिया 2022' या निवडणुकीची धामधूम होती. सर्व उमेदवार आपापल्या चिन्हासह प्रचार कार्यात गुतंले होते. शनिवारी सकाळपासून शाळेत पुन्हा धामधूम होती. मतदान प्रतिनिधी, मतदार अधिकारी, सुरक्षा रक्षक, केंद्राध्यक्ष यांसह मुख्य निवडणूक अधिकारी, निवडणूक प्रशिक्षण अधिकारी, अशा सगळ्यांनी ऑनलाईन ईव्हीएम निवडणुक प्रक्रियेच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले. विशेष म्हणजे त्या दिवशी शाळेतील उपस्थित एकूण 150 विद्यार्थी मतदारांनी प्रत्यक्ष मतदानात सहभाग नोंदवला. त्यात निवडलेल्या शालेय मंत्रिमंडळाचा निकाल निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सोपविला. मतमोजणी अधिकाऱ्यांनी मतदान विद्यार्थी उमेदवारांच्या प्रतिनिधी समोर निकाल जाहीर केला. त्यानंतर त्यांचा शपथविधी झाला.