पालघर :स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील कामगिरीचे स्मरण करून देण्यासाठी राज्यभर 288 मतदारसंघात सावरकर गौरव यात्रा काढण्याची घोषणा युती शासनाकडून करण्यात आली होती. येत्या 30 मार्चपासून पालघर जिल्ह्यात या यात्रेला सुरुवात होणार आहे. पालघर जिल्ह्यातील सर्व शिवसेना भाजप यांच्यातील पदाधिकारी या यात्रेत सहभागी होऊन ही यात्रा यशस्वी करणार असल्याची घोषणा नंदकुमार पाटील यांनी पालघर येथे पत्रकार परिषदेत केली.
सावरकरांच्या कार्याची ओळख :नव्या पिढीला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याची ओळख करून देण्यासाठी 30 ते 6 एप्रिल 2023 पर्यंत सावरकर गौरव यात्रा चालणार आहे. याप्रसंगी बोलताना नंदकुमार पाटील यांनी उद्धव ठाकरे गटावरती टीका केली आहे. राहुल गांधी, काँग्रेसच्या अन्य नेत्यांकडून सावरकरांचा वारंवार अपमान केला जात आहे. त्यांच्यासोबत युती तोडण्याची हिंमत उद्धव ठाकरेंनी दाखवावी? असे आव्हान त्यांनी केले आहे. सावरकरांचा अपमान सर्व भारतीयांचा अपमान आहे. स्वतःची सत्ता टिकवण्यासाठी काँग्रेसकडून वारंवार स्वातंत्र्यवीरांचा अपमान होत आहे. एक वेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर मणिशंकर अय्यर यांनी टीका केली होती तेंव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी रस्त्यावर उतरून थेट मणिशंकर अय्यर यांच्या प्रतिमेला जोडे मारले होते. तशी हिंमत उद्धव ठाकरे रस्त्यावरून राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे मारण्याची हिंमत दाखवणार का ? असा प्रश्न केला आहे.