पालघर Sarpanch Meeting : पालघर तालुका विकासाचं मॉडेल बनवण्यासाठी सरपंचांनी एकत्र येऊन गावगाडा हाकण्याचा निर्धार केला केला. सरपंचांना असलेले अधिकार, विकासाचं प्रारुप तयार करण्यासाठी आणि सरपंचांना दिशा देण्यासाठी सरपंच परिषदेचे अध्यक्ष हेमंत संखे यांनी पुढाकार घेतलाय. त्यांनी पालघर पंचायत समितीत यासंदर्भात एक बैठक बोलवली होती.
80 सरपंचांची उपस्थिती : पालघर तालुक्यात 133 ग्रामपंचायती असून सरपंचांच्या बैठकीला सुमारे 80 ग्रामपंचायतीचे सरपंच यावेळी उपस्थित होते. गावगाडा कसा चालवायचा, गावातील प्रश्न कसे सोडवायचे, अधिकाऱ्यांचा विश्वास कसा संपादन करायचा, गावाच्या विकासासाठी निधी कुठून आणायचा याबाबत अनेक सरपंच अनभिज्ञ असतात. सरपंचांची पालघर जिल्ह्यात प्रभावी अशी संघटना नाही. त्यामुळं संखे यांनी पालघर पंचायत समितीच्या सभागृहात याबाबतची माहिती देण्यासाठी सरपंचांना एकत्र येण्याचं आवाहन केलं होतं.
सरपंचांनी अराजकीय काम करावं : सरपंच हा ग्रामविकासाचा दूत असतो. लोकांतून तो निवडून येतो. त्यामुळं लोकांच्या विकासाची जबाबदारी त्याच्यावर असते. या पार्श्वभूमीवर लोकनियुक्त सरपंचानं कुठल्याही राजकीय पक्षाची बूज न ठेवता, केवळ ग्राम विकासाचं ध्येय डोळ्यासमोर ठेवावं, असा सल्ला या परिषदेत संखे यांनी दिला. राज्यात हिवरे बाजार, राळेगण सिद्धी, पाटोदा अशा गावांची प्रेरणा घेऊन विकासाची दिशा घ्यावी, त्यासाठी अभ्यास दौरा करावा, यावर या बैठकीत चर्चा झाली.