पालघर - एका टायरच्या दुकानाचे शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी साडेअकरा लाख रुपये किमतीचे टायर लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मनोर येथील मस्तान नाका परिसरात असलेल्या असलेल्या दुकानात घडली.
टायरच्या दुकानातून साडेअकरा लाख टायरची चोरी, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल - टायरचोरी न्यूज
एका टायरच्या दुकानाचे शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी ११ लाख ५० हजार ४१२ रुपये किमतीचे टायर लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पालघर तालुक्यातील मनोर येथील मुंबई - अहमदाबाद महामार्गालगत, मस्तान नाका येथे भावेश लखियानी यांचे साई-यश टायर लॉबी नावाचे टायर विक्रीचे दुकान आहे. त्यांच्याकडे अपोलो टायर्सची एजन्सी आहे. गुरुवारी रात्री एक वाजताच्या सुमारास टायरच्या दुकानाशेजारी असलेल्या गॅरेजमधील मेकॅनिकला चाकूचा धाक दाखवून बांधून ठेवले. त्यानंतर टायरच्या दुकानाचे शटर तोडून हे चोरटे दुकानात शिरले आणि दुकानातील सुमारे ११ लाख ५० हजार ४१२ रुपये किमतीचे टायर चोरून चोरटे पसार झाले. चोरीचा मागमूस कोणाला लागू नये, यासाठी दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तोडफोड केली आहे. तसेच सीसीटीव्ही कॅमेरा रेकॉर्डर बॉक्सदेखील चोरटे आपल्यासोबत घेऊन गेले.
दुकानासमोर असलेल्या ओल्या जागेत उमटलेल्या एक ट्रकच्या टायरच्या ठशांमुळे चोरट्यांनी एका ट्रकमध्ये भरून हा चोरीचा माल नेला असावा, असा प्राथमिक अंदाज बांधण्यात येत आहे. याप्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस करीत आहेत.