पालघर- बंद घरांमध्ये घरफोडी करून घरातील सोन्याचा ऐवज आणि रोख रक्कम लुटून दरोडा टाकणाऱ्या टोळीच्या सातपाटी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून जवळपास 12 लाख 49 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पालघरमध्ये घरफोडी करणाऱया टोळीच्या आवळल्या मुसक्या; साडेबारा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त 14 फेब्रुवारी दांडी येथे, 28 मार्च सातपाटी व 29 एप्रिलला केळवा या तीन ठिकाणी घरफोडी करून दरोडा टाकण्याच्या घटना घडल्या होत्या. याप्रकरणी सातपाटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला, त्यानंतर सातपाटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांनी तपासासाठी पथक तयार केले होते. या पथकाने या प्रकरणातील मुख्य आरोपी सुमित भगवान शेळके (वय 22) याला अटक केली. आरोपीने गुन्ह्यात चोरी केलेले मोबाईल व वापरलेली मोटारसायकलदेखील जप्त करण्यात आली आहे.
त्याने चोरी केलेले सोन्याचे दागिने इतर साथीदाराकडे विल्हेवाट लावण्यासाठी दिले होते. त्यानंतर आरोपी नारायण भैरोसिंग चुंडावत (वय 23) विक्रमसिंग रामसिंग सोलंकी(वय 29), नारायण भोरसिंग सोलंकी( वय 24) या तिघांनादेखील अटक करण्यात आली आहे. या आरोपींकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटारसायकल व 12 लाख 49 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कारवाई सातपाटी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी जितेंद्र ठाकूर, पोलीस उप निरीक्षक सुनील पाटील, पोलीस उप निरीक्षक उमेश रोटे, सहायक पोलीस उपनिरीक्षक बि गुलशेर तडवी, सूर्यवंशी, बाळासाहेब पवार, हवालदार कमलाकर मदने, सौदागर रगडे, भारत सानप, रामदास ठाणगे, परमेश्वर मुसळे, मयुर बागल, भगवान आव्हाड यांनी केली आहे.