पालघर/वसई - वसई पूर्वेतील भागात असलेल्या तुंगारेश्वर पर्वतावरील पर्यटनस्थळाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम अजूनही पूर्ण करण्यात आले नाही. त्यामुळे येथून ये-जा करणाऱ्या नागरिकांना अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. असे असतानाही सुविधा न देताच येणारे पर्यटक व भाविकभक्त यांच्याकडून प्रवेश कर आकारला जात असल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
गाडीसोबत असेल तर वेगळा कर
टाळेबंदीतून शिथिलता मिळताच तुंगारेश्वर पर्वतावरील देवस्थान व पर्यटन सुरू झाले आहे. त्यामुळे या ठिकाणी नागरिक दर्शनासाठी व पर्यटनासाठी येऊ लागले आहेत. तर या देवस्थानाला प्रशासनाने पर्यटनस्थळाचा दिल्याने दरवर्षी मोठ्या संख्येने नागरिक या पर्यटनाला भेट देतात. या नागरिकांकडून प्रत्येक माणसी ४८ रुपये इतका प्रवेश कर व गाडीसोबत असेल तर त्याचा वेगळा कर वसूल केला जात आहे.
खडकाळ रस्त्यावरून करावा लागतो प्रवास
रस्त्याची सुविधा न देताच या भागात प्रवेश कराची आकारणी केली जाऊ लागली आहे. तरीही याभागात अजूनही रस्त्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली नाही. त्यामुळे खडकाळ रस्त्यावरून नागरिकांना प्रवास करावा लागतो. तर दुसरीकडे इतर प्राथमिक सुविधा ही पुरविल्या जात नाही.
प्रवेश आकारणी बंद करा
नागरिक शासनाला कर भरतात. मग त्यांना योग्य त्या सोयीसुविधा उपलब्ध करून देणे हे त्यांचे काम आहे. परंतु तसे होत नाही मग आमच्याकडून कर घेणे बंद करा, अशी मागणी नागरिकांनी केली. कर भरूनही जर सोयीसुविधा मिळत नसतील, तर त्याचा काय उपयोग असा प्रश्न उपस्थित केला आहे. या भागातील समस्या सोडवण्यात याव्यात यासाठी अनेकवेळा प्रशासन दरबारी तुंगारेश्वर देवस्थान यांच्यातर्फे मागणी केली आहे. परंतु याची दखल घेतली जात नसल्याने या येणाऱ्या नागरिकांच्या अडचणी कायम आहेत.
'पत्र पाठवले आहे'
तुंगारेश्वर देवस्थान व पर्यटनस्थळाच्या ठिकाणी असलेला रस्ता तयार करून देण्यात यावा, यासाठी आता पुन्हा एकदा पालकमंत्री, जिल्हाधिकारी, मुख्य वनसंरक्षक यांना पत्र पाठविले आहे. या प्रकरणात शासनाने लक्ष घालून येथील समस्या तातडीने सोडवाव्या, असे तुंगारेश्वर देवस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम पाटील म्हणाले.