पालघर - नायगाव पूर्वेतील ग्लोबल एरिना संकुलात नव्याने विकसित होणाऱ्या भव्य टॉवर्सच्या खोदकामामुळे संकुलात जाणारा शंभर फूट रस्ता अचानक खचल्याची घटना मंगळवारी घडली. या घटनेदरम्यान शाळकरी मुलांची एक बस रस्त्यावर होती. मात्र स्थानिकांनी वेळीच प्रसंगावधान दाखवल्यामुळे जीवितहानी टळली.
रस्ता खचल्याने या परिसरातील 24 माळ्यांच्या इमारतींना धोका उद्बवला आहे. त्यामूळे येथील रहिवासी प्रचंड तणावात आहेत. विकासकाने एका वर्षात 24 माळ्यांच्या 14 इमारती बांधल्या आहेत. या इमारतींजवळ सेप्टीक टँक बांधण्यासाठी कोणतीही परवानगी न घेता विकासकाने मोठा खड्डा खोदण्यास सुरूवात केली आहे. मंगळवारी सकाळी या परिसरातील रहिवासी मॉर्निंग वॉकला जात असताना या खड्ड्याला लागून असलेला मुख्य रस्ता खचत असल्याचे त्यांना दिसून आले. त्यानंतर सुरक्षिततेसाठी हा रस्ता नागरिकांनी बंद केला.