पालघर - विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. जिल्ह्यातील विक्रमगड विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. हा भाजपचा गड मानला जातो. याच मतदारसंघात दिवंगत खासदार चिंतामण वनगा, माजी मंत्री विष्णू सवरा यांचे वर्चस्व होते. जनसंघ आणि भाजपच्या मुशीत तयार झालेल्या कार्यकर्त्यांच्या कामगिरीमुळे येथे भाजपचे वर्चस्व पाहायला मिळते.
पालघरच्या विक्रमगड विधानसभा मतदारसंघात तिकीटासाठी रस्सीखेच - भाजप महाराष्ट्र राज्य आदिवासी आघाडी प्रमुख हरिचंद्र भोये
भाजपचे महाराष्ट्र राज्य आदिवासी आघाडी प्रमुख हरिचंद्र भोये यांनी येथील भाजपच्या आगामी वाटचालीबद्दल माहिती दिली. विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधीत्व सद्या माजी मंत्री तथा आमदार विष्णू सवरा करत आहेत.
मतदारसंघात भाजपकडून स्वत: हरिचंद्र भोये हे निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्याच बरोबर विक्रमगडचे सभापती मधुकर खुताडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सुरेखा थेतले, माजी सभापती ज्योती भोये आदींची नावे चर्चेत असल्याचे भोये यांनी सांगितले. विष्णू सवरा यांची विकास कामे आणि या मतदारसंघातील पंचायत समित्या, जिल्हा परिषद सदस्य, सरपंच आणि सामाजिक संस्थांच्या पाठबळावर भाजप हा बालेकिल्ला राखेलच, असा ठाम विश्वास हरिचंद्र भोये यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केला आहे.