पालघर - जिल्ह्यातील 6 मतदारसंघातील आमदारांनी विधिमंडळात विचारलेल्या प्रश्नांचा आढावा युनिसेफ आणि संपर्क संस्था, मुंबई यांच्या माध्यमातून घेण्यात आला. त्या अनुषंगाने मतदारसंघातील विविध समस्या आमदार यांच्या सोबत चर्चा, निवेदनाद्वारे सोडविण्यासाठी पालघर जिल्हा आमदार संवाद मंच स्थापन करण्यात आला आहे. या संवाद मंचाचे संतोष पाटील जिल्हा प्रतिनिधित्व करतात. तसेच या संवाद मंचात आजी-माजी सभापती, शेतकरी वर्ग, विविध सामाजिक स्तरावरील व्यक्तींचा यात समावेश आहे.
हेही वाचा -पालघरमध्ये श्रीनिवास वनगांच्या प्रश्नावर आदित्य ठाकरेंचा काढता पाय
जिल्ह्यात वसई-विरार विधानसभा, नालासोपारा, बोईसर, डहाणू, पालघर, विक्रमगड हे 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. संवाद मंचाकडून मतदारसंघातील विविध समस्या तसेच बालहक्क संरक्षण समिती स्थापन करणे व बालविवाह विरोधी कायदा, असे विविध विषय आमदार व स्थानिक स्वराज्य संस्थेला निवेदन देवून तो मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील डहाणू विधानसभा मतदारसंघातील आमदार पास्कल धनारे यांनी अधिवेशन काळात सर्वाधिक प्रश्न उपस्थित केले आहेत. जिल्ह्यातून सन 2014 ते 18 या काळातील सर्व 13 अधिवेशने (एकूण दिवस 198), त्यातील अर्धा तास चर्चा, लक्षवेधी सूचना व तारांकित प्रश्न असे एकूण 148 प्रश्न विचारले गेले. जिल्ह्यातून आदिवासीविषयक एकूण 18 प्रश्न मांडले गेले. धनारे यांनी सर्वाधिक 50 प्रश्न विचारले. अभ्यासविषयांमध्ये पाणी या विषयावर सर्वाधिक 3 प्रश्न त्यांनीच विचारले. घोटाळे-गैरव्यवहारविषयक एकूण 42 प्रश्न विचारले गेले. त्यापैकी सर्वाधिक 26 पास्कल धनारे यांनी मांडले.