पालघर - तौक्ते चक्रीवादळामुळे डहाणू व तलासरी भागात अतोनात नुकसान झाले असून अनेक भागात अध्याप वीजपुरवठा सुरळीत झालेला नाही. या पार्श्वभूमीवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोद निकोले यांनी महावितरण कार्यालयास भेट देऊन आढावा घेतला.
'लवकरात लवकर दुरुस्ती करावी'
डहाणू आणि तलासरी हे दोन तालुके पालघर जिल्ह्यात येतात. हा भाग आदिवासी आहे. येथे मोठ्या प्रमाणात दुर्गम भाग आहे. बऱ्याच ठिकाणी व्यवस्थित विजेची सोय नाही. अशा परिस्थितीत असताना 'तौक्ते' चक्रीवादळ आल्याने येथे वीजचे आणखीनच मोठ्या प्रमाणावर विजेचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार विनोद निकोले यांनी आज शिष्टमंडळास येथील महावितरण कार्यालयास भेट दिली. येथील अभियंत्यांकडून परिस्थितीची माहिती निकोले यांनी घेतली. विजेचे खांब, ट्रान्सफॉर्मेर, तुटलेल्या तारा यांची दुरुस्ती करावी व खंडित झालेला वीज पूर्वव्रत करावी असा सूचना निकोले यांनी यावेळी केल्या. त्यावर येत्या ४ ते ५ दिवसांमध्ये सर्व विभागामध्ये वीजपुरवठा पूर्वव्रत करण्यात येईल, अशी ग्वाही महावितरण उपकार्यकारी अभियंता धोडी यांनी दिली.
'पंचनाम्यापासून वादळग्रस्त लोक वंचित राहू नयेत'
तौक्ते चक्रीवादळामुळे डहाणू किनारपट्टीवरील मच्छिमार बांधवांचे, शेत जमिनीचे, फळ बागांचे, अनेक घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यावर डहाणू तहसील कार्यालय येथे तहसीलदार राहुल सारंग, गट विकास अधिकारी यांच्यासह कृषी अधिकारी व विभागातील सर्व सर्कल अधिकारी यांच्यासोबतही आमदार निकोले यांनी आढावा बैठक घेतली. मतदारसंघात झालेल्या नुकसानीचा अहवाल निकोले यांनी घेतला. त्यावर संपूर्ण पंचनामे लवकर तयार करून, त्यात एकही शेतकरी किंवा तौक्ते चक्रीवादळग्रस्त लोक वंचित राहणार नाहीत, याची काळजी घ्या अशा सूचनाही आमदार निकोले यांनी दिल्या. त्यावर एकही शेतकरी वंचित राहणार नाही याची ग्वाही येथील संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.