महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पालघर : एकाच मंदिरात दोन गणेश मूर्ती, शिवपिंडींसह अनेक ऐतिहासिक वास्तूंचे अवशेष - पालघर वाडा गारगाव न्यूज

वाडा तालुक्यातील एकाच मंदिरात दोन गणेश मूर्ती आणि दोन शिवलिंग असलेले रामेश्वर मंदिर परिसरातील कुतूहल निर्माण करतेय. या मंदिर परिसरांत अनेक ऐतिहासिक वास्तूंचे अवशेष आढळले आहेत. अनेक कथा-दंतकथा ऐकिवात असलेला हा परिसर हा नक्की कोण राजे शासक पूर्वी होते, याचा ठोस पुरावा अजून मिळत नाही. पुरातत्व विभागाद्वारे या जागेचा शोध शासनाने घ्यावा, अशी मागणी गावकऱ्याकडून करण्यात आली आहे.

पालघरमध्ये ऐतिहासिक वास्तू
पालघरमध्ये ऐतिहासिक वास्तू

By

Published : Jan 17, 2021, 2:28 PM IST

पालघर -एकाच ठिकाणी दोन गणेश मूर्ती आणि दोन शिवलिंग असलेलं मंदिर कुठे पाहिलं आहे का? पण असं एक मंदिर पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात गारगाव इथं पाहायला मिळतंय. हा परिसर ऐतिहसिकदृष्ट्या पाहिला जातो. आजही येथील शेतकऱ्यांना शेतात शेतीची कामे करीत असताना जमिनीखाली गडप झालेल्या जुन्या ऐतिहासिक वास्तू आढळत असतात. संस्थान काळातील राजांच्या काळातील इतिहासाच्या पाऊलखुणा येथील जमिनीची खोदाई केल्यानंतर पाहायला मिळत आहेत.

पालघरमध्ये ऐतिहासिक वास्तूंचे अवशेष

पडक्या राजवाड्यांचे अवशेष

वाडा तालुक्यातील गारगाई नदीच्या तीरावर पूर्वी गारगाव हे गाव वसले होते. कालांतराने ते गाव नदी किनाऱ्यापासून दूर वसवले गेले. पण आजही जुन्या ठिकाणी पडक्या राजवाड्यांचे अवशेष एका उंच डोंगरमाथ्यावर आढळतात. त्याच परिसरात हनुमानाशी पौराणिक संदर्भ असलेल्या 'मकरध्वज' याची मूर्ती पहावयास मिळते. या ठिकाणी गावकऱ्यांनी लाकडी मंदिर उभे करण्याचा प्रयत्न अनेकदा केला. पण ते मंदिर टिकत नाही, ते कोसळत राहते, असे येथील गावकरी सांगतात.

हेही वाचा -बिबट्याने दोन बकऱ्यांचा पाडला फडशा; शेतकऱ्यात भितीचे वातावरण

एकाच मंदिरात दोन श्रीगणेशाच्या मूर्ती आणि दोन शिवलिंग असलेले रामेश्वर मंदिर

एकाच मंदिरात दोन गणेशाच्या मूर्ती असलेल्या आणि दोन शिवलिंग असल्याचे नदीकिनारच्या या रामेश्वर मंदिरांत आढळते. शिवाय, येथे बंद केलेले भुयारही आढळले आहे. हा परिसर पाहून या ठिकाणी तत्कालीन राजेशाही असल्याचे जेष्ठ नागरिक सांगत असतात.

शेतकऱ्याला शेत जमीन खोदाईत थडगे आढळले

नदीकिनारी शेतजमीन असलेल्या ठिकाणी एक आदिवासी समाजाचा शेतकरी शेती कामाकरिता शेतीत खोदाई करीत असताना घडीव अशा पाषाण दगडाचे थडग्याचे अवशेष सापडले. गावकरी जमून हे नक्की काय आहे हे कुतूहलाने लोक गर्दी करीत आहेत.

नदीपात्रातील डोहांची नावे - कुंभारी आणि घोडद डोह
नदी किनारी असलेल्या पाण्याच्या डोहाला ही येथील नागरिक पूर्वीच्याच नावाने ओळखतात. येथील जुने लोक आजही या गारगाई नदीकिनारी पूर्वी राजेशाहीत घोडे धुण्यासाठी वापरल्या जात असलेल्या डोहाला 'घोडद डोह' म्हणून संबोधतात. तर, ज्या ठिकाणी विटा तयार करत असत. त्या जागेच्या पाण्याच्या ठिकाणाला 'कुंभारी' संबोधतात.


अनेक कथा-दंतकथा ऐकिवात असलेला हा परिसर हा नक्की कोण राजे शासक पूर्वी होते, याचा ठोस पुरावा अजून मिळत नाही. पुरातत्व विभागाद्वारे या जागेचा शोध शासनाने घ्यावा, अशी मागणी गावकऱ्याकडून करण्यात आली आहे.

हेही वाचा -बर्ड फ्ल्यू : राज्यात एकूण १००० पक्षांचा मृत्यू; तपासणीसाठी नमुने पाठवले

ABOUT THE AUTHOR

...view details