पालघर -जिल्ह्यातील समुद्रातील माशांचे उत्पादन घटले असून याचा फटका स्थानिक मच्छिमार व मासेमारीवर अवलंबून असलेल्या व्यवसायांना बसलेला पहायला मिळतो. तौक्ते वादळ, निसर्ग वादळ, पर्ससीन नेट मासेमारी तसेच हवामान बदलामुळे येथील माशांचे प्रमाण घटले ( Reduced Fish Production ) आहे. जिल्ह्यातील मत्स्योत्पादनातील घट जवळपास 20 हजार टनाच्या घरात पोहोचली आहे.
मत्स्य उत्पादन घटण्याची कारणे -प्रामुख्याने नैसर्गिक आणि मानवनिर्मित कारणांचा समावेश आहे. हवामानात सातत्याने होणारे बदल, किनारपट्टीवर वारंवार येणारे चक्रीवादळे यास कारणीभूत ठरत आहेत. निसर्ग, तौक्ते वादळ यामुळे मासेमारी उत्पादनावर परिणाम झाला आहे. पालघर जिल्ह्यातील तारापूर औद्योगिक क्षेत्रात रासायनिक कारखाने उभे राहिले आहेत. या रासायनिक कंपन्यांचे सांडपाणी योग्य प्रक्रिया न करताच समुद्रात सोडले जात आहे. यामुळे प्रदूषण वाढत चालेले आहे. माशांची पैदास प्रामुख्याने कांदळवनात होते. त्या कांदळवनांचे अस्तित्त्व सध्या धोक्यात आले आहे. कांदळवनांची कत्तल करून त्या ठिकाणी भराव केल्याची अनेक प्रकरणे गेल्या वर्षात समोर आली आहेत. त्याचाही परिणाम मत्स्य प्रजोत्पादनावर होत आहे. सागरी हद्दीत परप्रांतीय बोटींची घुसखोरी, हेदेखील मत्स्य उत्पादन घटण्यामागचे एक कारण आहे. जास्त मत्स्य उत्पादन मिळावे यासाठी एलईडी दिव्यांचा वापर वाढला आहे. हा वापर मत्स्य प्रजातींसाठी घातक ठरत आहे. पारंपरिक जाळ्यांऐवजी पर्ससीन नेटचा वापर मोठ्या प्रमाणात झाला आहे.
मच्छिमार संकटात -पालघर जिल्ह्याला 85 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला असून पश्चिम किनारपट्टी वरील बहुतांशी गावही मासेमारीवर अवलंबून आहेत. सातपाटी, वसई, नायगाव, अर्नाळा, एडवण, मुरबे, दांडी, झाई या प्रमुख बंदरांवरून मासेमारी होते. या बंदरावरून दररोज हजारो मासेमारी नौका मत्स्य उत्पादन घेत आहेत. सातपाटी हे बंदर पापलेट माशांसाठी जगप्रसिद्ध असून विक्री होणारे पापलेट जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहेत. डहाणू समोरील समुद्रात घोळ, दाढा, रावस, सुरमयी अशा मत्स्य उत्पादनाची नोंद आहे. वडराई या गावातील बोंबील सुप्रसिद्ध आहेत. पापलेट, घोळ, सुरमय, रावस हे मासे उत्तम दर्जाचे असल्याने या माशांना परदेशातही मोठी मागणी आहे. याच मासेमारीतून वर्षाकाठी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. मात्र, मागील दोन वर्षांपासून हवामानातील बदल आणि वारंवार येणारी चक्रीवादळ यामुळे मासेमारीला प्रचंड नुकसान सहन करावे लागले आहे. माशांच्या उत्पादनात प्रचंड घट झाली असून आठ ते दहा दिवस बोट समुद्रात राहूनही खलाशांना मासे मिळत नाहीत. यामुळे मासेमारी आणि या व्यवसायावर अवलंबून असलेले इतर व्यवसाय सध्या संकटात सापडले आहेत.