पालघर -औरंगाबादच्या नामांतरामुळे वाद होऊन महाविकास आघाडी सरकार पडेल, त्यामुळे या सरकारने नामांतराच्या वादात पडू नये, असा टोला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला आहे. यापूर्वी 1995 साली शिवसेनेची सत्ता होती तसेच मागच्या सरकारमध्येही शिवसेना त्यावेळीच सेनेला नामांतर करता आले असते. पण, तसे शिवसेनेने का केले नाही, असा सवाल यावेळी रामदास आठवले यांनी उपस्थित केला आहे. पालघर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मुंबई महानगरपालिकेत भाजप-रिपाइंची सत्ता येईल
उद्धव ठाकरे हे सध्या मुख्यमंत्री आहेत. मात्र, ते पुढे किती दिवस मुख्यमंत्री राहतील हे सांगता येत नाही. त्यामुळे हे सरकार पडून भाजप आणि रिपाइंचे सरकार राज्यात बसेल. तसेच मुंबई महानगरपालिका निवडणुकीत तीनही पक्ष वेगवेगळे लढणार आहेत. यामुळे यावेळी भाजप व रिपाइं सत्तेत येणार असून भाजपचा महापौर तर रिपाइंचा उपमहापौर असणार आहे, असा विश्वास यावेळी आठवले यांनी व्यक्त केला आहे.