पालघर - केंद्र शासनाने 65 हजार कोटींच्या वाढवण बंदर प्रकल्पासाठी गुंतवणूक केल्याने सव्वा लाख लोकांना रोजगार उत्पन्न होत स्थानिक प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या आणि जमिनीचा चांगला मोबदला मिळणार आहे. त्यामुळे, वाढवण बंदराला विरोध न करता पाठिंबा द्यावा, असे सांगून आपला वाढवण बंदराला पाठिंबा असल्याची घोषणा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली. पालघर दौऱ्यावर आले असता, आयोजित पत्रकार परिषदेत ते पत्रकारांशी बोलत होते.
रिपाईचा वाढवण बंदर उभारणीला पाठिंबा
देशातील सर्वात मोठे बंदर म्हणून वाढवण बंदर ओळखले जाणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 65 हजार कोटींची गुंतवणूक केली आहे. स्थानिकांचा वाढवण बंदराला विरोध असून मच्छीमार व्यावसायाला धोका निर्माण होणार असल्याची माझी माहिती आहे. परंतु, माझी सर्वांना नम्र विनंती आहे, की बऱ्याच वर्षानंतर इतका महत्वपूर्ण आणि मोठा प्रकल्प होणार आहे, ज्यामुळे सव्वा लाख लोकांना रोजगार निर्माण होऊन स्थानिकांना नोकऱ्या मिळणार आहेत. अनेकांचा यामुळे फायदा होणार असून, दुसरीकडे रस्त्यासाठी 550 एकर जमीन संपादित केली जाणार आहे. त्यात शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा -आमची कुस्ती भाजप आणि एमआयएमसोबत - बांधकाम मंत्री अशोक चव्हाण
पत्रकारांनी, अणुऊर्जा प्रकल्पासाठी पोखरण, अक्करपट्टी मधील जमिनी संपादित केलेल्या स्थानिकांना आतापर्यंत किती नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या? काय सुविधा दिल्या? तसेच वाढवण बंदरामुळे समुद्रात 5 हजार एकरावर भराव टाकल्याने तेथील मासेमारीचे क्षेत्र संपुष्टात येणार असल्याने मच्छिमारांसाठी पर्यायी व्यवस्था काय? आदी प्रश्न विचारल्यावर राज्यमंत्री समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. लोकांच्या भावनांचा विचार करणे अवश्यक असल्याचे सांगून आपल्या अडचणी, प्रश्नांबाबत आपण केंद्र सरकारशी बोलू, असे उत्तर त्यांनी दिले.