पालघर - पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात शोककळा पसरली. या दु:खाच्या वेळी मुलीच्या लग्नातील आहेराची सर्व धनराशीच सैनिकांकरिता देऊन डहाणू येथील राजपूत कुटुंबियांनी वेगळा आदर्श घालून दिला आहे. अशोक ओघडभाई राजपूत आणि कुटुंबियांचे यामुळे सर्वत्र कौतुक होत आहे.
डहाणू तालुक्यातील सरावली येथील अशोक राजपूत हे एका कंपनीत व्यवस्थापक पदावर कार्यरत आहेत. त्यांची थोरली मुलगी भावना (वय २५) हिचा विवाह कोडिणार गावातील केतुल वालजीभाई जेठवा (वय २६) यांच्याशी २४ फेब्रुवारीला ठरला. लगीनघाई सुरू असताना १४ फेब्रुवारीला पुलावामा येथील दहशतवादी हल्ल्यात ४५ सीआरपीएफ जवानांना वीरमरण आले. या घटनेनंतर संपूर्ण देशभरात शोक लहर उमटली होती. लग्नकार्याच्या तोंडावर अशी दुर्दैवी घटना घडल्याने राजपूत कुटुंबीयही हळहळून गेले. हा अनोखा विवाहसोहळा चर्चेचा विषय बनला असून राजपूत कुटुंबियांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.