पालघर - राज्य सहकारी आदिवासी विकास महमंडळामार्फत भात खरेदी केंद्राकडून भात पिकाला आधारभूत किंमत मिळते. तसेच, रब्बी हंगामातील कडधान्यांचीही खरेदी ही भात खरेदी केंद्रांकडून व्हावी व त्यांना आधारभूत किंमत मिळावी, अशी मागणी परळीतील शेतकऱ्यांनी केली आहे.
कडधान्यांची खेरदी भात खरेदी केंद्राने करावी; परळीतील शेतकऱ्यांची मागणी परळी येथे आधारभूत खरेदी योजनेच्या भात खरेदी केंद्राचे उद्घाटन अनुसूचित जमाती कल्याण समितीचे प्रमुख तथा आमदार दौलत दरोडा आणि विक्रमगड विधानसभा मतदार संघाचे आमदार सुनील भूसारा यांच्या हस्ते झाले. यावेळी शेतकऱ्यांकडून सदर मागणी करण्यात आली. यावर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू, असे आश्वासन आमदारांकडून देण्यात आले.
भात पिकाबरोबर कडधान्यातही शेतकऱ्यांची होत आहे फसवणूक
भात पिकाच्या खरेदीत जसे अडते आणि दलालांमार्फत शेतकऱ्यांना कमी भाव देवून त्यांची फसवणूक केली जाते, त्याचप्रमाणे कडधान्य पिकाला आधारभूत किंमत मिळत नसल्याने व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे. बाजारभावापेक्षा कमी भावात कडधान्य पिकांची खरेदी होत असल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली. तसेच, भाताबरोबर मुग, वाल, हरभरा, तुर, उडीद या कडधान्यांची खरेदी ही भात खरेदी केंद्रांकडून करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
त्याचबरोबर, भात खरेदी केंद्रे ही खाजगी जागेत सुरू आहेत. त्यांचे भाडे शासनाने द्यावे, जेणेकरून ती लवकरात लवकर सुरू होतील, अशी मागणी देखील शेतकऱ्यांनी केली.
हेही वाचा-तब्बल सात महिन्यानंतर कामण ते वसई एसटी सेवा सुरू, प्रवाशांना दिलासा