पालघर -जिल्ह्यातील अनुसूचित जमाती पेसा क्षेत्रातील सरळसेवा शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्यात यावी, या मागणीसाठी पालघर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. आदिवासी डीटीएड, बीएड कृती समितीच्या नेतृत्वात आदिवासी समाजातील डीटीएड, बीएड धारक विद्यार्थ्यांनी हे उपोषण सुरू केले. पेसा क्षेत्रातील शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्याबाबत वारंवार पत्रव्यवहार, निवेदन, आंदोलने करण्यात आली. याबाबत बैठकादेखील घेण्यात आल्या. मात्र, कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने पुन्हा एकदा आमरण उपोषणाचा पवित्रा या विद्यार्थ्यांनी घेतला आहे.
40 दिवस उलटून गेले तरी...
पालघर जिल्ह्यात पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या रिक्त 1662 जागा भरण्यात याव्यात, यासाठी आदिवासी समाजातील डीटीएड, बीएडधारक पात्र विद्यार्थ्यांनी मागील दोन वर्षांपासून आंदोलने, निवेदने व पत्रव्यवहार करीत आहेत. 23 ऑगस्टला पालघर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयासमोर या विद्यार्थ्यांनी बेमुदत उपोषण केले. त्यावेळी मिळालेल्या आश्वासनानंतर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पालघर जिल्हा परिषदेमधील पेसा क्षेत्र शिक्षक भरतीप्रक्रिया 21 दिवसात पूर्ण करण्याचे आश्वासन या विद्यार्थ्यांना देण्यात आले. मात्र, 40 दिवस उलटून गेले. तरीही याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. आपली दिशाभूल व फसवणूक झाल्याचा आरोप जिल्ह्यातील या आदिवासी समाजातील डीटीएड, बीएडधारक पात्र विद्यार्थ्यांनी केला आहे.
हेही वाचा -Breaking News - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे राज्यसरकारने थांबवले वेतन
पालघर जिल्ह्यात पेसा शिक्षक भरती प्रक्रिया राबविण्यात यावी. भरती प्रक्रिया पवित्र पोर्टल वरून न करता आदिवासी विकास विभागामार्फत स्थानिक पातळीवर घेण्यात यावी, आदींसह विविध मागण्यांसाठी पालघर जिल्ह्यातील आदिवासी समाजातील डीटीएड, बीएड धारक पात्र विद्यार्थ्यांनी पालघर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण असेच सुरू राहील, असा आक्रमक पवित्रा या उपोषणकर्त्यां विद्यार्थ्यांनी घेतला आहे.