विरार: मुसळधार पावसाने ( Heavy Rain) सलग तिसऱ्या दिवशीही वसई-विरार (Presence of torrential rain) शहराला झोडपून काढले. परिणामी शहरातील अनेक सखल भागांत दरवर्षीप्रमाणे पाणी साचले. शहरातील काही सोसायटी आणि घरांत पाणी शिरल्याने नागरिकांना मंगळवारची रात्र पाण्यात काढावी लागली.
शहरातील मुख्य रस्तेही पाण्याखाली गेल्याने शहरात सकाळपासून वाहतूक कोंडी झालेली दिसत होती. परिणामी नोकरी-व्यवसायानिमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांना ट्रॅक्टर व त्यावेळी मिळेल त्या वाहनांनी प्रवास करावा लागत होता.विरार पश्चिम येथील विवा कॉलेज, जकात नाका, नालासोपारा पूर्व येथील तुळींज रोड, सेंट्रल पार्क व वसईतील एव्हर शाईन रस्ता तिसऱ्या दिवशीही पाण्याखाली होता. वसईतील सनसिटी-गास रोडची स्थितीही यापेक्षा वेगळी नव्हती. मंगळवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पडलेल्या पावसामुळे वसईत काही ठिकाणी मोठमोठ्या वृक्षांची पडझड झालेली पाहायला मिळाली.
वसई-पाचूबंदर येथील एका घरावर लिंबाचे झाडाची फांदी झुकल्याने संभाव्य धोका लक्षात घेऊन वसई-विरार महापालिकेच्या वसई गाव अग्निशमन विभागाला कळवण्यात आले. ही माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी रवाना होत; मशीनने झाड कापून बाजूला केले. अशाच प्रकारची दुसरी पडझडची घटना वसई पश्चिम भुईगाव स्वामी वाडी येथे घडली. वसई पश्चिम भुईगाव स्वामी वाडी येथे रस्त्याजवळील वडाचे झाड मुळातून उन्मळून सतीश दुकाली यांच्या घराच्या समोरील पत्र्याच्या शेड वर पडले. याबाबतची माहिती प्रमोद भोईर यांनी दिल्यानंतर उपस्थानक अग्निशमन केंद्र सनसिटी दिवाणमान यांच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत हे झाड कापून बाजूला केले.