पालघर :पालघर डहाणू आरोग्य विभागाच्या सुविधांच्या अभावामुळे तेथे नेहमीच नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागतो. अशीच एक घटना समोर आली आहे, ज्यामध्ये आईने आपल्या बाळासह जीव गमवला आहे. डहाणूतील ओसरविरा येथील सोनाली वाघात या २१ वर्षीय गरोदर मातेला प्रसुतीसाठी २७ मे ही तारीख देण्यात आली होती. मात्र आज अचानक तिला प्रसवकळा होऊ लागल्या. तिच्या नातेवाईकांनी तिला कासा उपजिल्हा रुग्णालयात आणले. रुग्णालयात तिला एका नर्सकडून गोळी देण्यात आली. त्यानंतर बऱ्याच वेळ तिच्याकडे दुर्लक्ष केले गेले. कुटुंबियांनी कासा रुग्णालयातील डॉक्टरांची भेट घेतली. डॉक्टरांनी तिला डहाणूतील धुंदलवाडी वेदांता रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला.
प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे जीव गेला :तिला धुंदलवाडी रुग्णालयात रुग्णवाहिकेने नेत असताना तिथे पोहोचण्याआधीच तिचा मृत्यू झाला, असे वेदांत रुग्णालयातील डॉक्टरांकडून सांगितले गेले. कासा उपजिल्हा रुग्णालयातील प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे माता व बाळ या दोघांचा जीव गेल्याचा आरोप कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे. या घटनेनंतर मयत गर्भवती मातेच्या कुटुंबीयांनी रुग्णालय परिसरात टाहो फोडला असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे.
ही घटना जर डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाली असेल तर त्यांच्यावर कारवाई व्हावी. - प्रकाश निकम, जिल्हा परिषद अध्यक्ष पालघर
आरोग्य व्यवस्था जबाबदार :दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय आढावा बैठकीचे सत्र पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत सुरू होते. त्यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी या घटनेविषयी पालकमंत्र्यांना माहिती दिली. उपजिल्हा रुग्णालय असताना आरोग्य व्यवस्थेची वाताहत असल्याची कल्पनाही दिली. त्या ठिकाणी आयसीयू युनिट असते, तर त्या मातेचा व गर्भाशयातील बाळाचा मृत्यू झाला नसता. त्याला आरोग्य व्यवस्था जबाबदार असल्याचा ठपका त्यांनी ठेवला.