पालघर - मोखाडा तालुक्यातील आसे येथील आत्महत्याग्रस्त काळू पवार यांच्या कुटुंबियांची विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी सांत्वनपर भेट घेतली. या आदिवासी कुटुंबाला भाजपाच्या वतीने आर्थिक मदत व अन्न-धान्याच्या जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या आहेत. याप्रसंगी भाजपाच्या आमदार मनिषा चौधरी, जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील, तालुकाध्यक्ष संतोष सोते यांच्यासह प्रांत अधिकारी, पोलीस अधिक्षक उपस्थित होते. मोखाडा येथील काळू पवार या 48 वर्षीय मजुराने मालकाने 500 रुपयांसाठी केलेल्या पिळवणुकीला कंटाळून आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर दरेकरांनी सोमवारी पीडित कुटुंबाची भेट घेतली.
देरकर म्हणाले, काळू पवार यांची अशा प्रकारे पिळवणूक झाल्याने आत्महत्येसारखे पाऊल उचलावे लागणे ही घटना अतिशय गंभीर आहे. या आदिवासी कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, तसेच या आदिवासी कुटुंबाची घरकुल योजनेची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावे. त्यांच्या मुलांना आदिवासी आश्रम शाळेत दाखल करुन घ्यावे. खावटी योजनेचा लाभ या आदिवासी कुटुंबाला लवकर मिळवून द्या, अशा सूचना दरेकर यांनी उपस्थित प्रांत अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या आहेत.
मुबई-ठाणेपासून काही तासाच्या अंतरावरील आदिवासी गावातील हे विदारक चित्र पाहावयास मिळाले. या दुरावस्थेला येथील शासकीय यंत्रणा जबाबदार आहे. या आदिवासी महिलेप्रमाणे आज अनेक आदिवासी महिला घरकुल योजनेपासून वंचित राहिल्या आहेत. या आदिवासींसाठी काम करण्याची आवश्यकता आहे. त्या मुलाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याची माहितीही कोणत्याही यंत्रणेने घेतलेली दिसत नाही. येथील यंत्रणेचे हे सपशेल अपयश आहे. विरोधी क्ष म्हणून हा विषय नक्कीच धसास लावल्याशिवाय राहणार नाही असे विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यावेळी म्हणाले.