महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बोईसर पाठोपाठ विक्रमगड विधानसभा मतदारसंघात बंडखोरीची लागण ?

बोईसर विधानसभा मतदारसंघात भाजपचे जिल्हा सरचिटणीस संतोष जनाठे हे युतीचे शिवसेनेचे उमेदवार विलास तरे यांच्या विरोधात बंड करीत आहेत. तर विक्रमगड विधानसभा निवडणुकीत युतीचे भाजपचे उमेदवार हेमंत सवरा यांच्या विरोधात शिवसेनेचे प्रकाश निकम हे बंड करू पाहत आहे.

By

Published : Oct 2, 2019, 8:54 PM IST

संपादित छायाचित्र

पालघर (वाडा)- अहोरात्र काम करूनही पक्षाने माझा विश्वासघात केल्याचा आरोप करत मोखाडा तालुक्यातील जिल्हापरिषद सदस्य प्रकाश निकम यांनी आपल्या शिवसेना सदस्यपदाचा आणि पालघर जिल्हापरिषदेच्या गट नेते पदाचा राजीनामा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठवला आहे. तो सोशल मीडियावरही व्हायरल करण्यात आला आहे. तर निकम हे अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार असल्याची चर्चा मतदारसंघात आहे.

प्रकाश निकम यांनी आपल्या शिवसेना सदस्यपदाचा आणि पालघर जिल्हापरिषदेच्या गट नेते पदाचा राजीनामा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठवला आहे.

प्रकाश निकम यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत पालघर जिल्ह्यातील विक्रमगड मतदारसंघात शिवसेनेकडून उमेदवारी मिळविली होती. यात त्यांचा पराभव झाला आणि माजी मंत्री विष्णू सवरा हे निवडून आले होते. यावेळी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस हे एकमेकांच्या विरोधात लढले होते.

हेही वाचा - बोईसर : भाजपच्या संतोष जनाठेंचे पक्षाविरोधात बंड; उद्या भरणार अपक्ष उमेदवारी अर्ज

निकम यांनी मोखाडा पंचायत समितीवर भगवा फडकवला व तालुका आणि विक्रमगड तालुक्यातील ग्रामपंचायतीवर सेनेचे वर्चस्व प्रस्थापित केले. शिवसेनेसाठी अहोरात्र काम करूनही मला जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीमध्ये पक्षाने पाडले. तसेच जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मला प्रचंड विरोध करून विधानसभा निवडणुकीत सेना भाजप युती झाली तर मला विधानसभेचे तिकीट दिले जाईल, असे आश्वासन देण्यात आले. या सर्व प्रकारात विश्वासघात झाल्याचा आरोप करत नाराज प्रकाश निकम यांनी आपल्या लेटरहेडवरच पक्ष सदस्यत्वाचा आणि जिल्हा परिषदेच्या गटनेतेपदाचा राजीनामा लिहिला आहे.

हेही वाचा -विक्रमगड विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून हेमंत सावरांना उमेदवारी

अशा प्रकारे बोईसर विधानसभा मतदारसंघात भाजपचे जिल्हा सरचिटणीस संतोष जनाठे हे युतीचे शिवसेनेचे उमेदवार विलास तरे यांच्या विरोधात बंड करत आहेत. तर विक्रमगड विधानसभा निवडणुकीत युतीचे भाजपचे उमेदवार हेमंत सवरा यांच्या विरोधात प्रकाश निकम हे बंड करू पहात आहे. यामुळे पालघर जिल्ह्यात शिवसेना आणि भाजपमध्ये बंडखोरीची लागण सुरू झाली आहे. हे बंडोबा थंडोबा होतात का? आणि यावर दोन्ही पक्ष श्रेष्ठी काय पवित्रा घेतात यावर सर्वांचे लक्ष लागले आहे

ABOUT THE AUTHOR

...view details