पालघरPooja Patil : पंजाबमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय महिला कबड्डी स्पर्धेसाठी निवड समितीने निवडलेला महाराष्ट्र संघ आज रवाना झाला. मात्र यामधे पालघर तालुक्यातील सफाळे येथील महिला कबड्डीपटू पूजा पाटीलचे महाराष्ट्र कबड्डी संघात नाव असूनही अचानक तिचे नाव डावलल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे पूजा पाटीलने राज्य निवड समितीवर आरोप केला आहे. खेळाडूंवरील अन्याय रोखण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करून राज्य निवड समितीवर याचिका दाखल करणार असल्याचं, पूजा पाटीलने सांगितलं. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री, आदिवासी विकास मंत्री, तसंच कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांना पत्रव्यवहार करूनही कुठलीही कारवाई न झाल्याने तिने नाराजी व्यक्त केलीय.
या खेळाडूंचाही सराव शिबिरात समावेश: 70 व्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत पालघर संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. या स्पर्धेत पूजा पाटीलने उत्कृष्ट कामगिरी करत पालघरला तृतीय क्रमांक पटकावण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. या स्पर्धेमधून महाराष्ट्राच्या संघाची निवड करण्यात आली होती. यामध्ये पूजा पाटीलचा निवड यादीत समावेश करण्यात आला होता. मात्र उपांत्य फेरीत पालघर संघाने ज्या संघास पराभूत केलं होतं, त्या संघातील दोन खेळाडूंना सराव शिबिरासाठी निवडण्यात आलं होतं. पालघर संघाने तृतीय क्रमांक फटकावून सुद्धा एकाही संघातील खेळाडूचा शिबिरासाठी विचार केला नव्हता. त्याचप्रमाणे अहमदनगर येथे झालेल्या स्पर्धेत जे खेळाडू खेळले नाहीत त्या खेळाडूंचाही सराव शिबिरात समावेश केला होता अशी माहिती, पूजा पाटीलने दिलीय.